LMOTY 2023: ‘लाव रे तो व्हिडिओ’चा जन्म कसा झाला? राज ठाकरेंनी केला खुलासा; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 09:09 PM2023-04-26T21:09:44+5:302023-04-26T21:10:14+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: ‘लाव रे तो व्हिडिओ’ची धार कमी झाल्यासारखी वाटते का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता.
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023:लोकमततर्फे दिला जाणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा दिमाखदार पुरस्कार सोहळा मुंबईत झाला. या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार आणि लोकप्रिय अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि बँकर, गायिका तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली. राजकारण, कुटुंब आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. अमोल कोल्हे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’चा जन्म कसा झाला? असा नाविन्यपूर्ण प्रयोग कसा सूचला? याबाबत प्रश्न विचारला. यावर राज ठाकरे यांनी खुलासा केला.
लाव रे तो व्हिडिओचा ही संकल्पना सभांमधून मी प्रथम आणली नाही. तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल की, मुंबई शहरातील अनधिकृत झोपडपट्टींचे फोटो काढले होते. त्यावेळी व्हिडिओ वगैरे काही नव्हते. त्याचे एक प्रेझेंटेशन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रंगशारदा येथे दिले होते. ते प्रेझेंटेशन देत असताना ती झोपडपट्टी कोणत्या विभागात नवीन तयार झाली, तिकडचा नगरसेवक कोण, तिकडचा आमदार कोण आणि तिकडचा खासदार कोण, याबाबत सांगितले होते. त्यावेळी बरेचसे नगरसेवक, आमदार शिवसेनेचे होते. खासदार काँग्रसचे होते, काही भाजप आणि काही अन्य पक्षांचे होते. हे प्रेझेंटेशन करत असताना ऑडिओ-व्हिज्युअलचा वापर केला होता, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
सरकार आरसा म्हणून ही गोष्ट दाखवली गेली पाहिजे
मी अॅडव्हरटायझिंगचा विद्यार्थी आहे. त्यामुळे ऑडिओ-व्हिज्युअलचा प्रभाव जेवढा तुमच्यावर पडतो, तेवढा अन्य गोष्टींचा पडत नाही. एक व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो, ते तुम्ही कितीही बोललात तरी ते समजण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो. अनेकदा व्यंगचित्र काढताना, व्यंगचित्रातून जी गोष्ट मांडू शकतो, तेवढी कदाचित लेखातून मांडू शकणार नाही. व्हिज्युअल जास्त प्रभाव पाडत असते. अशा प्रकारे सरकार आरसा म्हणून ही गोष्ट दाखवली गेली पाहिजे. मग ते सरकार कुणाचेही असो. तुम्ही ही गोष्ट दाखवली त्याचे काय झाले, असे प्रश्न विचारले पाहिजे. त्यातूनही ती गोष्ट होत नसेल आणि त्याकडे दुर्लक्ष करून मतदान होत असेल, तर मग कसली लोकशाही आपण घेऊन बसलो, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी लोकमतच्या मुलाखतीत बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, लाव रे तो व्हिडिओ याची धार कमी झाल्यासारखी वाटते का, असा प्रश्नही राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, ज्या वेळेला मला टीका करायची असेल तेव्हा मी टीका करणार. निश्चित करणार. परंतु, सरकारकडून चांगली कामे होत असतील, झाली, तर त्याची मोकळेपणाने स्तुतीही करावी, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"