लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:36 IST2025-07-31T14:35:41+5:302025-07-31T14:36:48+5:30
Ganesh Mandal Pandal Fine: गणपती मंडपासाठी खड्डा खणल्यास मंडळावर यंदा सातपट म्हणजे १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता.

लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर
गणपती मंडपासाठी खड्डा खणल्यास मंडळावर यंदा सातपट म्हणजे १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता. या निर्णयावर गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 'लोकमत मुंबई'च्या माध्यमातूनही मुंबईतील सार्वजनिक मंडळांचं म्हणणं प्रशासनापर्यंत मांडण्यात आलं होतं. त्यावर अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत खड्ड्यांसाठीचा दंड १५ हजारावरुन पुन्हा २ हजारावर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.
मंडपासाठी खड्डा खणल्यास पालिका यापूर्वी प्रत्येक खड्ड्यामागे दोन हजार रुपये दंड आकारत होती. मात्र १५ हजार रुपयांचा दंड अवाजवी असून तो रद्द करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीने राज्य सरकार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली होती. तसंच मुंबईतील रस्त्यांवर हजारो खड्डे पडेल आहेत. त्यावर कंत्राटदारांना जबाबदार धरुन त्यांच्यावर किती दंड आकारला गेला आहे, असा सवाल उपस्थित करत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
'लोकमत मुंबई'ने उठवलेला आवाज...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड २ हजार रुपये इतकाच राहणार असल्याचं अखेर आज जाहीर केलं आहे. "गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५,००० रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. आता जुन्या नियमानुसार केवळ २,००० रुपये शुल्क आकारले जाईल. मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे. मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा", असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
गणपती बाप्पा मोरया!
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 31, 2025
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची (रस्ते पुनर्स्थापना शुल्क ) रक्कम मुंबई महापालिकेने वाढवली होती. यासंदर्भात मी मुंबई महापालिका आयुक्त श्री.भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली आणि दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ…
गणेश मंडळांनी दंडाच्या रकमेवरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही याबाबत आयुक्तांशी बोलून सकारात्मक निर्णय घेऊ आणि योग्य तोडगा काढू असं आश्वासन दिलं होतं.