Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय निरुपम यांच्या उमेदवारीविरोधात कामत-देवरा गट सक्रीय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 17:40 IST

काँग्रेस पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा तिढा अजून सुटलेला नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकीटांवरून निरुपम विरोधी गट आक्रमक झाले आहेत.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - काँग्रेस पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा तिढा अजून सुटलेला नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकीटांवरून निरुपम विरोधी गट आक्रमक झाले आहेत.उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून त्यांना तिकीट न देता त्यांच्या पूर्वीच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून तिकीट द्यावी यासाठी काँग्रेसमधील कामत आणि देवरा गट सक्रीय झालेला आहे. 

2014 ची लोकसभा निवडणूक मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी उत्तर मुंबईतून लढवली होती. त्यावेळी निरुपम यांचा सुमारे 4 लाख 46 हजार मतांनी विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी पराभव केला होता. निरुपम हे उत्तर पश्चिम मतदार संघात लोखंडवाला परिसरातील शास्त्रीनगर येथे राहतात. त्यामुळे गुरुदास कामत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. याठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी संजय निरुपम यांचे दिल्ली दरबारी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.

मात्र निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून तिकीट न देता त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून तिकीट देण्यात यावी यासाठी आता काँग्रेसचे जेष्ठ नेते आक्रमक झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री मिलींद देवरा, आमदार नसीम खान, माजी आमदार बलदेव खोसा यांनी संजय निरुपम यांना उत्तर मुंबई मधूनच उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. जर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आपला पूर्वीचा उत्तर मुंबई मतदार संघ सोडून त्यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून तिकीट दिल्यास चुकीचा संदेश जाईल आणि त्याचा परिणाम आमच्या निवडणुकांवर होईल असं मत देवरा गटाने मांडले आहे. 

निरुपम यांना कोणत्याही परिस्थितीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून तिकीट देऊ नका यासाठी कामत गट देखील  सक्रिय झाला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चर्तुवेदी यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. कामत गटाचे नेते दिल्लीत गेले काही दिवस तळ ठोकून बसले आहेत. कामत गटाने दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, वाय.सी.वेणुगोपाळ यांची भेट घेतली असून निरुपम यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध केला आहे. 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात तुम्ही सर्व्हे करा. या मतदारसंघातून माजी मंत्री कृपाशंकर सिग,अभिनेत्री नगमा, प्रियांका चतुर्वेदी, माजी मंत्री सुरेश शेट्टी, संजय निरुपम, गणेश यादव आदी नेते मंडळी इच्छुक आहेत. तुम्ही सर्व्हे करा, मग येथील लोकप्रिय व जिकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला तिकीट द्या अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे कामत गटाने केल्याचे सांगितले.

टॅग्स :लोकसभा निवडणूकसंजय निरुपमकाँग्रेसमुंबईगुरुदास कामत