Join us  

महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातील तोफा आज थंडावणार; १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 4:55 PM

Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी शुक्रवार १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. देशात सात टप्प्यात निवडणुका होणार असून, आज काही मतदारसंघातील प्रचारसभांच्या तोफा थंडावणार आहेत.  शुक्रवार १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदारसंघातील प्रचारसभा आज बुधवारी सायंकाळपर्यंत थांबणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहेत. 

१९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात या टप्प्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघात आता प्रचार शेवटच्या टप्प्यावर आला असून आज सायंकाळी प्रचारसभा आणि प्रचार थांबणार असून शुक्रवारी या मतदारसंघातील उमेदवारांचं भविष्य मतपेटीत असणार आहे. 

महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार?

रामटेक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे राजू पारवे मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून श्याम बर्वे मैदानात आहेत. वंचितने अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला आहे. 

नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, तर महाविकास आघाडीकडून विकास ठाकरे मैदानात आहेत.तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुतीने सुनील मेंढे यांना तर मविकास आघाडीने प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात वंचितनेही उमेदवार जाहीर केला असून संजय केवट यांना उमेदवारी दिली आहे. 

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात महायुतीने अशोक नेते यांना महाविकास आघाडीने नामदेव किरसान यांना तर वंचितने हितेश मडावी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातही जोरदार लढत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना तर महायुतीने भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार मैदानात आहेत. आता या मतदारसंघातील प्रचारसभा आज बुधवारी थांबणार असून शुक्रवार १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणुक रणांगण २०२४भाजपाकाँग्रेस