Join us  

अजूनही होऊ शकते युती, जर भाजपाने दूर केली शिवसेनेची 'ही' भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 3:01 PM

Lok Sabha Election 2019: २०१९च्या निवडणुकीत 'एकीचं बळ' वापरण्याचे प्रयत्न विरोधकांनी सुरू केल्यानंतर भाजपाला आपल्या मित्रांची आठवण झाली आहे. मात्र, एक भीती युतीच्या वाटेत आडवी येत असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागा स्वबळावर लढवण्याचा जणू निर्धारच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसा तर स्वबळाचा नारा त्यांनी काही महिन्यांपूर्वीच दिला होता, पण तरी लोकसभा निवडणुकीत ते भाजपाला, मोदी-शहांना सुखद धक्का देऊ शकतात आणि सेनेचाही फायदा करून घेऊ शकतात, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, एक भीती युतीच्या वाटेत आडवी येत असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत 'एकीचं बळ' वापरण्याचे प्रयत्न विरोधकांनी सुरू केल्यानंतर भाजपाला आपल्या मित्रांची आठवण झाली आहे. सर्वात जुना मित्र असलेल्या शिवसेनेला गोंजारण्यासाठी अलीकडच्या काळात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उद्धव ठाकरेंशी 'कानगोष्टी' केल्या. ही 'मिशन लोकसभे'ची मोर्चेबांधणीच होती. परंतु, लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाचे नेते शिवसेनेला स्वार्थासाठी जवळ करतील आणि गरज सरल्यावर विधानसभेवेळी दूर लोटतील, अशी शंका शिवसेना नेतृत्वाला वाटते. त्यामुळे दोन्ही विधानसभा निवडणुकींचा फॉर्म्युला आधीच पक्का झाला आणि त्यात शिवसेनेला योग्य वाटा मिळाला, तर कदाचित युतीचं गणित जमूही शकेल, असं काही मंडळी खासगीत सांगतात. कारण, युती करायची की नाही, यावरूनही शिवसेनेत दोन गट असल्याचं समजतं. 

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या दृष्टीनं रणनीती आखण्यासाठी शिवसेना भवनात बैठक बोलावली होती. या बैठकीला दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर, शिवसेना लोकसभेच्या राज्यातील 48 जागा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे सध्या १८ खासदार आहेत. त्यापैकी तीन मुंबईतील आहेत. स्वबळावर लढायचं झाल्यास त्यांना मुंबईत तीन जागांसाठी उमेदवार निवडावे लागतील. गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे या निवड प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याचं समजतंय. परंतु, गणपतीनंतर शिवसेना-भाजपामध्ये बेरजेचं गणितही मांडलं जाऊ शकतं, याकडेही राजकीय जाणकार लक्ष वेधतात. अर्थात, त्यासाठी गरज आहे ती भाजपाने शिवसेनेला विश्वासात घेण्याची. त्यांच्या मनातील रास्त भीती दूर करण्याची. कारण, २०१४ मध्ये एकट्या भाजपालाच २८२ जागा मिळाल्यानंतर त्यांनी रालोआतील मित्रांना खिजगणतीतच घेतलं नव्हतं. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होऊ नये, याची पुरेपूर काळजी शिवसेना घेईल.

शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिल्यापासून भाजपाची नेतेमंडळी त्यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. याचाच अर्थ त्यांना शिवसेनेची आवश्यकता आहे असा होतो. त्यामुळे 'मोके पे चौका' मारण्याची नामी संधी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. ते तिचं सोनं करतात का, यावर बऱ्याच गोष्टी ठरतील.    

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९शिवसेनाभाजपाउद्धव ठाकरेनरेंद्र मोदी