Join us  

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 2:18 PM

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता मुंबईच्या बॉम्बस्फोटातील आरोपी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर भाजपा-शिवसेनेने जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला हादरवणाऱ्या १९९३ च्या बॉम्बस्फोटातील जखमा आजही मुंबईकरांच्या मनात खोलवर रुजल्या आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा ९३ च्या बॉम्बस्फोटातील आठवण ताजी झाली आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून भाजपाने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

भाजपा आमदार अमित साटम म्हणाले की, बुधवारी संध्याकाळी अंधेरी पश्चिम येथे मविआ उमेदवार अमोल किर्तीकरांच्या प्रचारात १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान उतरला होता. किर्तीकरांच्या समर्थनार्थ हा रॅलीत होता. त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादीविरोधात तुकडे तुकडे गँगशी आहे आणि ही लढाई भारत पाकिस्तानची झाली असून मुंबईकरांच्या मारेकऱ्यांसोबत काँग्रेसचा हात आणि मुंबईला जाळणारी मशाल कोणती हे आता जनतेने ओळखावं असं त्यांनी म्हटलं आहे.

तर अमोल किर्तीकर यांचा प्रचार १९९३ च्या ब़ॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सक्रियपणे करत आहेत. त्याचबरोबर लष्कर भरतीचे पेपर फोडणारा आरोपी  महेंद्र सोनावणे हा उबाठाचे शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांचा प्रचार प्रमुख आहे. भारतीय लष्करात पाकिस्तानी धार्जिणे लोकांची भरती कशी करता येईल, असा या सोनावणे याचा डाव होता तर १९९३ च्या बॉम्बस्फोटात मुंबईतील शेकडो निष्पापांचे जीव घेणाऱ्या  आरोपींसोबत उबाठाचा प्रचार पाहून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला वेदना होत असतील असा निशाणा शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.

दरम्यान, उदधव ठाकरे राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. मात्र त्यांचे खरे स्वरुप आता समोर आले आहे. यासंबधी फोटो आणि व्हिडिओचे पुरावे आहेत. अतिरेकी लोकांना सोबत घेऊन प्रचार करणाऱ्या उबाठा यांच्या नकली शिवसेनेने आता शिवसेना हा शब्द देखील वापरु नये. उबाठाचे संबध देशद्रोहयांशी आहेत. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे उबाठाला शिवसेना हे नाव देऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असंही डॉ. वाघमारे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई उत्तर पश्चिमशिवसेना