लॉकडाऊन : आवाजाचाही ‘आवाज’ बसला; मुंबईतले ध्वनी प्रदूषण घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 07:05 PM2020-06-04T19:05:14+5:302020-06-04T19:05:33+5:30

कारण एरव्ही ध्वनी प्रदूषणानाने वेढलेल्या मुंबईतील ध्वनी प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याची नोंद आवाज फाऊंडेशनने केली आहे.

Lockdown: The ‘voice’ of the voice also sat; Noise pollution in Mumbai decreased | लॉकडाऊन : आवाजाचाही ‘आवाज’ बसला; मुंबईतले ध्वनी प्रदूषण घटले

लॉकडाऊन : आवाजाचाही ‘आवाज’ बसला; मुंबईतले ध्वनी प्रदूषण घटले

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी जगभरात प्रयत्न करण्यात येत असून, यावर पहिल्या उपाय म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. जगभरासह देशात देखील लॉकडाऊन लागू असून, मुंबईत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाचे संवर्धन होत आहे. कारण एरव्ही ध्वनी प्रदूषणानाने वेढलेल्या मुंबईतील ध्वनी प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याची नोंद आवाज फाऊंडेशनने केली आहे. आवाज फाऊंडेशन ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप करण्याचे काम करत असून, लॉकडाऊन लागू झाल्यापासून, सातत्याने ध्वनी प्रदूषणाचा स्तर कमी नोंदविण्यात येत असल्याचे फाऊंडेशनचे म्हणणे आहे.

आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलाली यांनी लॉकडाऊनमधील ध्वनी प्रदूषणाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून आवाजाचा स्तर  कमी नोंदविण्यात येत आहे. मार्च महिन्यात आवाजाची पातळी ५२.६ डेसिबल नोंदविण्यात आली होती. एप्रिल महिन्यात आवाजाची पातळी ५६.४ डेसिबल नोंदविण्यात आली. मे महिन्यात आवाजाची पातळी ५२.९ एवढी नोंदविण्यात आली. वांद्रे आणि आसपासच्या परिसरातील आवाजाच्या पातळीची ही नोंद असली तरीदेखील संपुर्ण मुंबईत ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमीच राहिले आहे. रस्त्यावर कमी प्रमाणात वाहत असलेली वाहने, बंद असलेले उद्योगधंदे, बंद असलेली कार्यालये, बंद असलेली लोकल, एक्सप्रेस यासह अनेक  घटक लॉकडाऊनमुळे बंद असल्याने आवाजाचे प्रमाण कमी असल्याचे नोंदविले जात आहे. मात्र याचपूर्वीच्या काळात येथे आवाजाची पातळी ८५ ते १०० डेसिबलच्या आसपास नोंदविण्यात आल्याचेही सुमेरा यांनी सांगितले. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत एका दिवसांत तब्बल १०० हून अधिक झाडे कोसळल्याचे सुमेरा यांनी सांगितले. परिणामी तापमान वाढीसारख्या समस्यांवर आपण आता बोलते झाले पाहिजे. निसर्ग संवर्धनासाठी आपण पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दुसरीकडे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या पातळीचे विश्लेषण करण्यासाठी वातावरण संस्थेने सिपिसिबीच्या संकेत स्थळावरील आकडेवारीचा उपयोग केला होता. २५ मार्च रोजी रात्री १२ वाजता करण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या घोषणेअगोदरच मुंबई शहर हे राज्याने घोषित केलेल्या लॉकडाऊनचे पालन करत होते. याचाच परिणाम म्हणून मुंबई शहराच्या हवा-प्रदुषणाच्या पातळी मध्ये १७ मार्चपासूनच घट झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाला हरविण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले असतानाच मुंबईकरांनी याच काळात प्रदूषणालादेखील हरविले आहे. कारण लॉक डाऊनमुळे हवा प्रदूषित करणारे घटक नियंत्रणात असल्याने साहजिकच मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी हवेची गुणवत्ता चांगली, उत्तम व समाधानकारक नोंदविण्यात येत आहे. विशेषत: रस्त्यांवर वाहने नसल्याने हवेतील प्रदूषण मोठया प्रमाणावर कमी झाले असून, लॉक डाऊनमुळे कोरोनाला हरविताना मुंबईकर प्रदूषणालदेखील हरवित असल्याचे चित्र आहे.

Web Title: Lockdown: The ‘voice’ of the voice also sat; Noise pollution in Mumbai decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.