Join us

Lockdown News: मजुरांना परराज्यात नेण्यासाठी मुंबईतून सुरू होणार रेल्वे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 06:38 IST

महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा मंत्रिमंडळाने घेतला व समाधान व्यक्त केले

मुंबई : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी लवकरच मुंबईतून रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिपरिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मुंबईनजीकच्या रेल्वे स्थानकावरून आधीच गाड्या रवाना होत आहेत. मात्र प्रत्यक्ष मुंबईतील कुठल्याही रेल्वे स्थानकावरून अद्याप मजुरांना नेणारी गाडी सुटलेली नाही. मुंबईतील परप्रांतीय मजुरांमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारचे मजूर आहेत. उत्तर प्रदेश सरकारशी राज्य शासनाने चर्चा केली. त्यांच्या काही अटी असल्यामुळे अडथळे निर्माण झाले होते. मात्र आता प्रश्न मिटला असून मुंबईतून रेल्वेगाड्यांनी मजुरांना नेले जाईल,असे एका ज्येष्ठ मंत्र्याने लोकमतशी बोलताना सांगितले. याबाबत रेल्वे प्रशासनाशी राज्य शासनाने चर्चा केली असून गाड्यांची मागणी केली आहे. महाराष्ट्राला जेवढ्या रेल्वेगाड्यांची आवश्यकता आहे त्याच्या तुलनेत फारच कमी गाड्या दिल्या जात असल्याबद्दल आजच्या मंत्रिपरिषद बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली

महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा मंत्रिमंडळाने घेतला व समाधान व्यक्त केले. कालपर्यंत महाराष्ट्रातून १५ आणि आज रात्री १० अशा २५ रेल्वेगाड्या आतापर्यंत कामगारांना घेऊन इतर राज्यात घेल्या आहेत अशी माहिती प्रधान सचिव डॉ नितीन करीर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली दिली. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली येथे बाहेरील राज्यातून मजुरांना घेऊन कालपर्यंत २ रेल्वे आल्या अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

परराज्यांतील लोकांप्रमाणे राज्यांतर्गत अडकलेल्या लोकानांही आपापल्या घरी जाण्यासाठी मंत्रीमंडळ सदस्यांनी सुचना केल्या.डॉ संजय ओक यांनी देखील या मंत्री परिषदेत कोरोना विषयक उपाययोजनांची माहिती दिलीप्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास आणि मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादरीकरण केले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसरेल्वे