Lockdown: Mumbai struggles to get back on track; Attempts to fold the economic sector | Lockdown: पुन्हा रुळावर येण्यासाठी मुंबईची धडपड; आर्थिक क्षेत्राची घडी बसविण्याचे प्रयत्न

Lockdown: पुन्हा रुळावर येण्यासाठी मुंबईची धडपड; आर्थिक क्षेत्राची घडी बसविण्याचे प्रयत्न

मुंबई : कधीही न झोपणारे शहर अशी मुंबईची ओळख आहे. परंतु, पूर आणि अतिरेकी हल्ल्यातही कच न खाणाऱ्या मुंबईला जैविक हल्ल्यामुळे ब्रेक लागला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातील सर्व उद्योगधंदे व व्यवहार कोलमडून पडले. गेले शंभर दिवस कोरोनारूपी संकटाचा सामना मुंबईकर अविरत करीत आहेत. मात्र या आपत्तीला धैर्याने तोंड देत जागतिक दर्जाच्या या शहरातील जनजीवन, अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी धडपडत आहे.

मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. उच्चभ्रू वस्तीपासून दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये या महामारीचा प्रादुर्भाव वाढत गेला. अत्यावश्यक सेवा वगळता मॉल्स, दुकाने, मल्टिप्लेक्स, सर्व व्यापारी संकुले, खासगी व सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली. यामुळे गेल्या तीन महिन्यांत मुंबईचे तसेच देशाचे हजारो कोटींचे आर्थिक नुकसान झाले. शहरातील पायाभूत प्रकल्प आणि विकासकामांनाही खीळ बसली. परंतु, प्रत्येक आपत्तीत आपले स्पिरीट कायम ठेवणाºया मुंबईने कोरोनाशी लढा दिला. राज्य सरकार, महापालिका आणि पोलीस दलाने एकत्रित येऊन मुंबईला सावरले. अनेक ठिकाणी कोरोनाला मात देण्यात यश आल्यानंतर आता पुन:श्च हरिओम होत आहे. मर्यादित कर्मचारी संख्येने खासगी कार्यालय, सम-विषम पद्धतीने दुकाने, मंडई सुरू झाली आहेत. स्वगृही गेलेले लाखो मजूरही पुन्हा मुंबईकडे दाखल होऊ लागले आहेत.

महागाई वाढली का?

  • भाजीपाला : डिझेलच्या दरात ३५ टक्के वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे वाहतूक खर्च सुमारे १५ टक्के वाढला आहे. त्याचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसतो. मालाची विक्री करताना तो खर्च समाविष्ट केल्याशिवाय व्यापाºयांजवळ पर्याय उरला नाही. या वाढीव रकमेचा भाजीदरांवर परिणाम झाल्याने भाज्यांच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे.
  • इतर आजार : मुंबईत उन्हाळ्यातील आरोग्यविषयक तक्रारींचे प्रमाण यंदा कमी झालेले दिसून आले. सध्या शहर-उपनगरात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, गेस्ट्रो, कावीळ, अतिसार व लेप्टो हे साथीचे आजार या काळात वाढताना दिसतात. मात्र या आजारांशी लक्षणे कोरोनाशी साधर्म्य असणारे असल्याने प्रशासनाकडून सुरुवातीला खबरदारी घेऊन आरोग्य शिबिरे राबविली जात आहे.
  • किराणा : अनेक जणांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा केल्यामुळे आणि वाहतूक बंद असल्याने तुटवडा निर्माण झाला होता. तसेच वस्तूंच्या दरात वाढ झाली होती. परंतु आता डिझेलच्या दरात वाढ झाली, त्यामुळे किराणा मालाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


काय सुरू?
उद्योग सुरू : सध्या अत्यावश्यक सेवेतील उद्योग सुरू आहेत. सेवा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, टेलिकम्युनिकेशन, फूड सेक्टरशी संबंधित कंपन्या सुरू आहेत.

मुंबईत ३५०००० दुकानदार आहेत. त्यांचे प्रतिदिन ५००० याप्रमाणे १०० दिवसात १७५००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता दुकाने सुरू आहेत, पण ग्राहक नाहीत. त्यामुळे दुकाने सुरू ठेवल्यास वीजबिल, कामगारांचे पगार हा खर्च आहे. दुकानदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत. सहा महिने हे असेच सुरू राहिले तर दुकाने बंद करावी लागतील. - विरेन शाह, अध्यक्ष,फेडरेशन ऑफ
रिटेल ट्रेडर्स असोसिएशन

काय बंद?
उद्योग बंद : मुंबईतील जे लघु उद्योग, लेबर वर्कचे काम करणारे, गारमेंटचे काम करणारे हे जे घरगुती उद्योग आहेत. ते सर्व बंद आहेत. बांधकाम उद्योग बंद आहे, मॅन्युफॅक्चरिंग बंद आहेत.

मुंबईत फेरीवाले, लघु उद्योगासह अनेक उद्योग वाहतुकीची सोय नसल्याने बंद आहेत. मुंबईतील ८० टक्के उद्योग बंद आहेत. त्याचा एकूण परिणाम रोजगारावर झाला. अनेक जण बेरोजगार झाले आहेत. वाहतूक नसल्याने वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने ज्याप्रमाणे उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले त्याप्रमाणे राज्य सरकारनेही पॅकेज जाहीर करावे - मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष, डीक्की

सध्याच्या हलाखीच्या परिस्थितीत उद्योगवृद्धी झाल्यास कामगारांना पगार मिळेल आणि उद्योजकांना फायदा होईल. त्यामुळे उद्योजकांनी अनलॉक २ मध्ये व्यवसाय सुरूच ठेवावा. - चंद्रकांत साळुंखे, अध्यक्ष ,एसएमई चेंबर ऑफ इंडिया

बेरोजगारी वाढली... लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढली. त्यात, काहींनी टोकाचे पाऊल उचलले. अनेकांच्या पगारावर कात्री बसली. तर हजारो मजूर रस्त्यावर उतरून पायीच घराकडे निघाले. यात, काहींना जीवही गमवावा लागला होता.

कोरोना रुग्णाची संख्या आता ४१ दिवसांनंतर दुप्पट होत आहे. आता कोविड मृत्यूदर आणखी कमी व्हावा यासाठी ‘महापालिका सांघिक कृती कार्यक्रम' निश्चित करण्यात आला आहे. हे मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक औषधोपचार करून त्या दृष्टीने खबरदारीही घेतली जाणार आहे. - इक्बाल सिंह चहल (आयुक्त, मुंबई महापालिका )

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न? : महापालिकेने कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी २० दिवसांवर नेण्यासाठी आठ सनदी अधिकाºयांचे पथक स्थापन केले. तसेच झोपडपट्टी विभागांमध्ये ‘चेसिंग द वायरस’ ही मोहीम सुरू करण्यात आली. उपनगरातील रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मिशन झिरो मोहीम सुरू आहे. त्याचबरोबर आता सेव्ह लाइफ स्ट्रॅटेजी या माध्यमातून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

ग्राहकांसह हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु राज्यात अद्याप बंद आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हॉटेल रेस्टॉरंटला मदत करण्यास उशीर केला, हा व्यवसाय पूर्णपणे बंद होईल. - शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार

मुंबईत २८ जूनपासून सलून सुरू झाली आहेत. पण आधीच आर्थिक संकटात असल्याने पीपीई किट आणि इतर साहित्य घेण्यासाठी पैसे नाहीत. तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे त्यामुळे दहा टक्के सलून सुरू आहेत. केवळ केशकर्तन करण्यास परवानगी आहे, पण त्यावरच खर्च भागणार नाही. त्यामुळे सरकारने पूर्ण परवानगी द्यावी. तसेच आर्थिक सहकार्य करावे. - प्रकाश चव्हाण, सचिव, मुंबई सलून अँड ब्युटी पार्लर असोसिएशन

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown: Mumbai struggles to get back on track; Attempts to fold the economic sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.