चर्चगेट स्थानकावरील ‘त्या’ दुकानाला टाळे; छापील किमतीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बाटल्या विकणे आले अंगलट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:29 IST2026-03-10T10:28:23+5:302026-03-10T10:29:18+5:30
चर्चगेट आणि महालक्ष्मी स्थानकांवरील अधिकृत स्टॉलवर १४ रुपयांना मिळणारी ‘रेल नीर’ची बाटली २० रुपयांना विकली जात असल्याचे समोर आले होते.

चर्चगेट स्थानकावरील ‘त्या’ दुकानाला टाळे; छापील किमतीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बाटल्या विकणे आले अंगलट
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावरील मे.फ्रेंड्स बाईट या दुकानाला टाळे ठोकण्यात आले आहे. ‘लोकमत’ने सोमवारी रेल नीरची बाटली १४ रुपयांऐवजी २० रुपयांना विकली जात असल्याचे उघड केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली. दंडात्मक कारवाईसाठी वाणिज्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना बाटलीबंद पाण्याची मागणीही वाढत आहे. याचाच गैरफायदा घेत, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील काही स्थानकांवरील स्टॉलधारक प्रवाशांकडून अधिक दर आकारत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
चर्चगेट आणि महालक्ष्मी स्थानकांवरील अधिकृत स्टॉलवर १४ रुपयांना मिळणारी ‘रेल नीर’ची बाटली २० रुपयांना विकली जात असल्याचे समोर आले होते. सामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात बाटलीबंद पाणी मिळावे, यासाठी दर निश्चित करण्यात आले असताना, काही दुकानदार प्रत्येक बाटलीमागे अतिरिक्त सहा रुपये घेत प्रवाशांची लूट करत असल्याचे दिसून आले. अशाच प्रकारची लूट इतरही स्थानकात सुरू आहे का? याबाबतही तपासणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी केली कारवाई
चर्चगेटचे स्टेशन मॅनेजर, उपस्टेशन सुपरवायझर यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. यावेळी त्यांनी फ्रेंड्स बाईट या दुकानातून पाण्याची बाटली खरेदी केलेल्या प्रवाशाकडे चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने १५ रुपयांना बाटली विकत घेतल्याचे सांगितले. याची नोंद घेत, अधिकाऱ्यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठवून दुकान बंद केले आहे.