ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:23 IST2025-08-05T11:57:02+5:302025-08-05T12:23:55+5:30
सुरुवातीला दोन लोकलची चाचणी; त्यानंतर सर्व लाेकल प्राेटाेटाइप हाेणार

ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार
महेश कोले -
मुंबई : ऑटोमॅटिक बंद होणाऱ्या दरवाजाच्या दोन लोकलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या लोकल तयार होत असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष सतीश कुमार यांनी सांगितले. प्रोटोटाइपच्या यशस्वी चाचणीनंतर सर्व लोकल अशा पद्धतीच्या करण्यात येतील. यासह २३८ एसी लोकलसाठी लवकरच निविदा प्रक्रिया होऊ शकते, अशीही माहिती सतीश कुमार यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुंब्रा दुर्घटनेनंतर बंद दरवाज्याच्या साध्या लोकल आणण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार एक डबा कुर्ला कारशेडमध्ये तयार करण्यात आला आहे. परंतु, तो सध्या वापरामध्ये येण्याची शक्यता नाही. रेल्वे यावर काम करत असून, आता संपूर्ण लोकलच अशा पद्धतीची बनविण्यात येत असल्याचे कुमार यांनी सांगितले. यासह मध्य रेल्वेवर अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांचा सुरक्षित प्रवास शक्य होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वे
एकूण गाड्या १६६
वापरातील गाड्या १३८
एकूण फेऱ्या १८१०
पश्चिम रेल्वे
एकूण गाड्या १११
वापरातील गाड्या ९५
एकूण फेऱ्या १४०६
लवकरच २३८ एसी ट्रेनसाठी निविदा
सतीश कुमार यांनी सांगितले की, रेल्वे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर चालणाऱ्या २३८ नवीन १२ डब्यांच्या एसी लोकल ट्रेन खरेदी करण्याचा विचार करत आहे. ‘आम्ही निश्चितच २३८ एसी लोकलची योजना आखत आहोत आणि त्याच्या तपशीलांवर काम करत आहोत. निविदा प्रक्रियेतील आव्हाने दूर केली जात असून, समस्या सोडवल्या आहेत. लवकरच २३८ एसी ट्रेनसाठी निविदा मागवू, असे कुमार म्हणाले.