अर्जासोबत कागदपत्रे ‘अपलोड’ची गरज नाही, आयोगाचे स्पष्टीकरण; शनिवारीही अर्ज स्वीकारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:39 IST2025-11-14T11:39:12+5:302025-11-14T11:39:38+5:30
Local Body Election: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त उमेदवारी अर्ज व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले.

अर्जासोबत कागदपत्रे ‘अपलोड’ची गरज नाही, आयोगाचे स्पष्टीकरण; शनिवारीही अर्ज स्वीकारणार
मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त उमेदवारी अर्ज व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले.
ऑनलाइन अर्जप्रक्रिया किचकट असल्याने ऑफलाइन अर्ज भरू द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली होती. आयोगाने असेही स्पष्ट केले की, संकेतस्थळावर माहिती भरलेल्या उमेदवारी अर्जाची आणि शपथपत्राची छापील प्रत घेऊन व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे.
राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
लॉगइन आयडी व पासवर्ड जपून ठेवा
इच्छुक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ पर्यंत २४ तास सुरू असेल. तोपर्यंत त्यावर कोणत्याही वेळी नोंदणी करता येईल. नोंदणी करताना तयार केलेला लॉगइन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो; कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते.
सही केलेल्या प्रिंटआउटसह आवश्यक त्या कागदपत्रांचा संच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे १७ नोव्हेंबरला दुपारी तीनपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांसह उमेदवारी अर्ज शनिवारी सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.