तिन्ही आरोपींविरुद्ध एलओसी जारी, बाइकवरून पडले म्हणून रिक्षाचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:12 IST2024-10-17T14:11:07+5:302024-10-17T14:12:27+5:30
दुसरीकडे बाइकवरून पडले म्हणून शूटर्सनी बाइकवरून न जाता रिक्षाचा आधार घेतला तसेच घटनेनंतर ओळख लपविण्यासाठी दोघांनी शर्टही बदलल्याचे तपासात समोर आले.

तिन्ही आरोपींविरुद्ध एलओसी जारी, बाइकवरून पडले म्हणून रिक्षाचा आधार
मुंबई : गुन्हे शाखेने बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील मास्टरमाइंड मोकाट असून, याप्रकरणातील पसार आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम आणि निशान अख्तर देश सोडून पळून जाऊ नये म्हणून लूक आऊट सर्क्युलर जारी केले आहे. दुसरीकडे बाइकवरून पडले म्हणून शूटर्सनी बाइकवरून न जाता रिक्षाचा आधार घेतला तसेच घटनेनंतर ओळख लपविण्यासाठी दोघांनी शर्टही बदलल्याचे तपासात समोर आले.
गुन्हे शाखेने याप्रकरणात गुरुमेल सिंग, धर्मराज राधे कश्यप, फंडिंग करणारा प्रवीण लोणकर, भंगारवाला हरीश कुमार निसाद यांना अटक केली आहे. मात्र, यामागील मास्टरमाइंडपर्यंत पोहोचण्यास गुन्हे शाखेला अद्याप यश आलेले नाही. शिवकुमारने बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करत हत्या केली. या घटनेनंतर यातील महत्त्वाचा पुरावा तीन दिवसाने घटनेपासून दोनशे मीटर अंतरावर सापडला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना या बॅगेची भर पडली. या बॅगेत हरीशने सेकंड हँड बाईक खरेदीची पावतीदेखील मिळाली. शूटर्सना बाइकवरूनच घटनास्थळ गाठून हत्येचा कट होता. मात्र, बाईक वरून जाताना पडल्याने त्यांनी तो निर्णय मागे घेत बाईक पुन्हा घराकडे पार्क करून रिक्षाने घटनास्थळ गाठले. शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा याने टर्किशमेड पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांनी जीव घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
झिशान यांनी घेतला तपासाचा आढावा
झिशान सिद्दीकी यांनी बुधवारी सायंकाळी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय गाठून सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांची भेट घेतली. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपासाचा आढावा घेत त्यांच्याकडील काही माहिती गुन्हे शाखेला दिली आहे. हत्या प्रकरणानंतर तपासात समोर आलेल्या विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. अर्धा ते पाऊण तास लखमी गौतम यांच्या दालनात ही चर्चा सुरू होती. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त शशी कुमार मीनादेखील हजर होते. झिशान यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तपासात काय काय समोर आले? गुन्ह्यांचा तपास कुठंपर्यंत आला? अशा विविध विषयांची माहिती घेत तपासाचा आढावा घेतला.