LMOTY 2026: मंत्री प्रकाश आबिटकर यांचा 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 19:29 IST2026-03-10T19:28:43+5:302026-03-10T19:29:38+5:30
राजकारण (इन्फ्लुएन्शियल) या विशेष श्रेणीमध्ये मंत्री प्रकाश आबिटकर यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

LMOTY 2026: मंत्री प्रकाश आबिटकर यांचा 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव!
Lokmat Maharashtrian of the year awards 2026: सार्वजनिक जीवनातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करणाऱ्या मानाच्या 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२६' सोहळ्यात कोल्हापूरचे लोकप्रिय नेतृत्व आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना सन्मानित करण्यात आले. राजकारण (इन्फ्लुएन्शियल) या विशेष श्रेणीमध्ये त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि चर्चेत असणारा बहुप्रतिक्षित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ हा सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान, विकी कौशल यांसह राज्यभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी राजकारण (इन्फ्लुएन्शियल) या विभागातून मंत्री प्रकाश आबिटकर यांना सर्वोकृष्ट कामगिरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.
नावाप्रमाणेच कामात ‘प्रकाश’ आणि जनतेच्या प्रश्नांत ‘आब’ राखणारे मंत्री प्रकाश आबिटकर हे आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. गारगोटी येथे युवा संघटनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन करत त्यांनी सार्वजनिक जीवनाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच काळात दूधसंस्था, पतसंस्था, वाचनालय यांसारख्या सामाजिक संस्थांची स्थापना करून समाजकारणाची भक्कम पायाभरणी केली. १९९७ मध्ये त्यांनी पंचायत समितीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि सदस्य म्हणून निवडून आले. १९९७-९८ मध्ये उपसभापतीपद भूषवले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामातून त्यांनी प्रशासनाची बारकावे समजून घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेत प्रवेश करत २००२ ते २००७ या काळात काम केले; स्थायी समिती सभापती म्हणून २००८ मध्ये त्यांनी ठसा उमटवला.
२०१४ ते २०१९ या काळात भूविकास बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे राधानगरी विधानसभा मतदारसंघ!!२००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव पत्करावा लागला होता. पण हा पराभव त्यांच्यासाठी थांबा नव्हता, तो पुढच्या विजयाची तयारी होती. २०१४ मध्ये शिवसेनेतून पुन्हा मैदानात उतरत त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर सलग तीन वेळा आमदार म्हणून जनतेचा विश्वास संपादन केला. २०१४ ते २०२४ या दशकात त्यांनी विकासाची सलग धुरा वाहिली. या काळात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे.
आरोग्य,पर्यटन,दळणवळण,शिक्षण यामध्ये भरीव काम करून या मतदारसंघाचा कायापालट केला.मतदारसंघावर असलेला "दुर्गम" शिक्का काही अंशी पुसण्यात त्यांना यश मिळाले आहे.
१५ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आली. अडीच तालुक्यांचा विस्तीर्ण व दुर्गम मतदारसंघ असताना सलग तीन वेळा निवडून येणारे ते पहिले लोकप्रतिनिधी ठरले. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या भागाला मंत्रीपद मिळवून देणारे ते पहिले मंत्री ठरले आहेत.
प्रकाश आबिटकर यांची खरी ओळख मात्र ‘पाणीदार आमदार’ अशीच आहे. राधानगरी मतदारसंघात लहान-मोठी धरणे उभारून हजारो एकर कोरडवाहू जमीन ओलिताखाली आणण्याचे काम त्यांनी केले. पाण्यासोबतच रस्ते, वीज, आरोग्य सेवा वाडी-वस्त्यांपर्यंत पोहोचवून त्यांनी विकासाचा प्रकाश दुर्गम भागात नेला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अनेक वस्त्यांवर मूलभूत सुविधा पोहोचल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करतात.
जिल्ह्याच्या राजकारणात ठसा उमटवणारी कामगिरी करत पक्षाने अलीकडील निवडणुकांत दमदार यशाची नोंद केली आहे. जिल्ह्यातील पाच महानगरपालिकांत घवघवीत यश मिळवत प्रभावी उपस्थिती दाखवली. कोल्हापूर महानगरपालिकेत तब्बल १५ सदस्य विजयी इचलकरंजी महानगरपालिकेत ३ सदस्य निवडून आणले. नगरपालिका स्तरावर वर्चस्व स्थापन करीत जिल्ह्यातील १३ नगरपालिकांपैकी ५ नगरपालिकांवर पक्षाचा झेंडा फडकला आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही लक्षणीय कामगिरी केली. शिवसेना पक्षाच्या चिन्हावर ९ मतदारसंघात विजय मिळवला तर आघाडीमार्फत ४ मतदारसंघात बाजी मारली. असे एकूण १३ मतदारसंघ जिंकत प्रभाव सिद्ध केला आहे. या सलग विजयांमुळे जिल्ह्यातील राजकारणात पक्षाची ताकद आणि जनाधार अधिक दृढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संघटनातून समाजकारण, समाजकारणातून स्थानिक राजकारण आणि तेथून राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंतचा हा प्रवास म्हणजे जिद्द, सातत्य आणि जनतेशी असलेली नाळ याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.