रावसाहेब बोराडे यांना जीवनगौरव, शासनाचे पुरस्कार जाहीर; कोल्हापूरचे डॉ. प्रकाश पवार, एकनाथ पाटील यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:36 IST2025-02-08T13:34:08+5:302025-02-08T13:36:21+5:30
मुंबई : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागांतर्गत दिले जाणारे वाङ्मय पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले. २०२४ वर्षाचा विंदा करंदीकर ...

रावसाहेब बोराडे यांना जीवनगौरव, शासनाचे पुरस्कार जाहीर; कोल्हापूरचे डॉ. प्रकाश पवार, एकनाथ पाटील यांचा समावेश
मुंबई : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागांतर्गत दिले जाणारे वाङ्मय पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले. २०२४ वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे (रावसाहेब रंगराव बोराडे) यांना जाहीर झाला आहे. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे यांना, तर डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. रमेश सीताराम सूर्यवंशी यांना आणि श्री. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. एकनाथ पाटील, डॉ. प्रकाश पवार यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये १० लाख, असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. नामवंत प्रकाशन संस्था पुरस्कार ५ लाख, तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धन पुरस्कारासाठी २ लाख रुपये रोख, असे स्वरूप आहे.
हे पुरस्कार राज्य शासनामार्फत मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकांना देण्यात येतात. या पार्श्वभूमीवर यंदापासून हे पुरस्कार गेट वे ऑफ इंडियासमोर दिमाखदार सोहळ्यात २७ फेब्रुवारी रोजी देण्यात येणार आहेत. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. नामवंत साहित्यिकांच्या समित्यांनी या पुरस्कारांची निवड केली असल्याचे सामंत यांनी सांगितले.
ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात वाङ्मय पुरस्कार प्रकार - प्रौढ वाङ्मय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसुत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या काव्यसंग्रहासाठी जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङ्मय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे (प्रस्थान ऊर्फ एक्झिट) यांना, प्रौढ वाङ्मय कादंबरीसाठीचा हरी नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर (दस्तावेज), प्रौढ वाङ्मय लघुकथेसाठीचा दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निंबाळकर (अंत्राळी) यांना,
प्रौढ वाङ्मय ललितगद्यसाठीचा अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी (गुरू विवेकी भला) यांना, प्रौढ वाङ्मय- विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड (प्रशासकीय योगायोग) यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङ्मय चरित्र याकरिता न.चिं. केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर (स्टीव्हन हॉकिंग), प्रौढ वाङ्मय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ. वसंत भा. राठोड (कल्लोळ) यांना, प्रौढ वाङ्मय समीक्षा/ संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के. क्षीरसागर पुरस्कार हा समीर चव्हाण (अखईं ते जालें तुकाराम : हिंदुस्तानी परिवेशात खंड १ आणि २) यांना जाहीर झाला आहे. प्रौढ वाङ्मय राज्यशास्त्र/ समाजशास्त्राकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नसल्याचे सामंत यांनी सांगितले.
प्रौढ वाङ्मय इतिहासाकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार (राजमाता जिजाऊ : सकल जनवादी क्रांतीच्या शिल्पकार), भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरुंदकर पुरस्कार उज्ज्वला जोगळेकर (मराठीतील संयुक्त तर्कसूचक अव्यये : फ्रेंच सिंद्धाताच्या प्रकाशात), विज्ञान व तंत्रज्ञानाकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार सुबोध जावडेकर ((दु)र्वतनाची वेध), शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार डॉ. ललिता विजय बोरा (अन्नप्रक्रिया उद्योग : फळे भाज्या प्रक्रिया तंत्रज्ञान आणि उद्योग), उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सुनीता सावरकर (ढोर- चांभार, स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ), तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन याकरिता सी.डी. देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आलेली नाही.
तत्त्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो. नांदापूरकर पुरस्कार या.रा. जाधव (जीव जगत् आणि ईश्वर), शिक्षणशास्त्र याकरिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हेमंत चोपडे (शून्य एक अनंत प्रवास), पर्यावरणसाठी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार माधव गाडगीळ (सह्याचला आणि मी : एक प्रेम कहाणी), संपादित/आधारित याकरिता रा.ना. चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल, अनुवादित याकरिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरुण पाठक, तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार सुप्रिया राज यांना घोषित करण्यात आला आहे. या प्रौढ वाङ्मय प्रकारातील प्रत्येक पुरस्काराची रक्कम रुपये १ लाख आहे.
बाल वाङ्मय पुरस्कारात कवितेसाठी बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे (मोराच्या गावाला जाऊ या), नाटक व एकांकिका याकरिता भा.रा. भागवत पुरस्कार संजय शिंदे (चार बालनाट्ये), कादंबरी प्रकारात साने गुरुजी पुरस्कार रेखा बैजल (तुमचा आमचा संजू), कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार शरद आपटे (कोतवाल), सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार डॉ. प्रमोद बेजकर (शरीराचे विलक्षण विज्ञान), तर बालवाङ्मय संकीर्ण या प्रकारातील ना.धो. ताम्हणकर पुरस्कार हा डॉ. आनंद नाडकर्णी (वादळाचे किनारे) यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्कारांची रक्कम रुपये ५० हजार आहे.
‘प्रथम प्रकाशन’अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार तान्हाजी रामदास बोऱ्हाडे (जळताना भुई पायतळी), नाटक/एकांकिका विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीश बोढारे (छिन्नी), कादंबरी प्रकारातील श्री.ना. पेंडसे पुरस्कार प्रदीप कोकरे (खोल खोल दुष्काळ डोळे), लघुकथेसाठीचा ग.ल. ठोकळ पुरस्कार डॉ. संजीव कुलकर्णी (शास्त्र काट्याची कसोटी), ललितगद्य ताराबाई शिंदे पुरस्कार गणेश मनोहर कुलकर्णी (रुळानुबंध) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम रुपये ५० हजार अशी आहे.
सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार अनुवादक योगिनी मांडवगणे यांना ‘आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ’ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला असून, या पुरस्काराची रक्कम रुपये १ लाख आहे.