डोक्यात अडकलेली गोळी काढून वाचविला जीव; जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:59 IST2025-10-05T06:59:38+5:302025-10-05T06:59:50+5:30
पठाणवाडी परिसरात ५५ वर्षीय अब्दुल्ला अव्वल बैग यांना गेल्या आठवड्यात रविवारी सकाळी ८:४७ वाजता गोळी लागल्याच्या अवस्थेत जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डोक्यात अडकलेली गोळी काढून वाचविला जीव; जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून मेंदूच्या खालच्या भागात अडकलेली बंदुकीची गोळी एंडोस्कोपी पद्धतीने यशस्वीरीत्या काढण्यात आली. गेल्या आठवड्यात रविवारी ही अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया झाली. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
पठाणवाडी परिसरात ५५ वर्षीय अब्दुल्ला अव्वल बैग यांना गेल्या आठवड्यात रविवारी सकाळी ८:४७ वाजता गोळी लागल्याच्या अवस्थेत जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर तपासणीत गोळी मेंदूच्या खालच्या भागात अडकल्याचे आढळून आले. त्यामुळे रुग्णाला गंभीर इजा झाली आणि मोठ्या प्रामाणावर रक्तस्राव झाला. कान, नाक आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण, सहायक प्राध्यापक डॉ. सुनिता बागे आणि मेंदू शस्त्रक्रिया विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. कमलेश कांगारी यांनी संयुक्तरीत्या ही अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आणि अडकलेली गोळी काढली. या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहकार्याने जागतिक दर्जाची आरोग्यसेवा दिली जात असून, ही शस्त्रक्रिया रुग्णसेवेतील एक उल्लेखनीय यश मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत जेजे रुग्णालयात विविध अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. नवीन अत्याधुनिक उपकरणांचा वापर त्यासाठी केला जात आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून या रुग्णाच्या मेंदूच्या खालच्या भागात लागलेली गोळी विविध विषयातील तज्ज्ञांनी येऊन ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
डॉ. अजय भंडारवार,
अधिष्ठाता, सर जेजे रुग्णालय
शस्त्रक्रियेसाठी मेंदू शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. हिमांशू ठेले यांनी मार्गदर्शन केले. तसेच भूलतज्ज्ञ प्रा. डॉ. उषा बडोले आणि डॉ. प्रेरणा जोगदंड यांनी रुग्णाची सुरक्षितता सुनिश्चित केली.