Join us  

मिठी नदीची पातळी वाढली; ५० नागरिक स्थलांतरित 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 3:25 PM

नदीची पातळी कमी झाल्यानंतर नागरिक स्वगृही परतले.

मुंबई : मिठी नदीची पातळी वाढल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून कुर्ला क्रांतीनगर येथील ५० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि मिठी नदीची पातळी कमी झाल्यानंतर नागरिक स्वगृही परतले. मात्र पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने रहिवाशांना धाकधूक लागून राहिली होती. 

थोडी अतिवृष्टी झाली तरी मिठी नदीकाठी राहणा-या रहिवाशांना धडकी भरते. कारण होत्याचे नव्हते झालेल्या २६ जुलैच्या पुराची चित्रे आजही रहिवाशांच्या डोळ्यासमोरून जात नाहीत. केवळ क्रांतीनगर नाही तर अंधेरी पूर्वेकडील साकीनाका, मरोळ, जरीमरी, सफेद पूल, कुर्ला येथील संदेश नगर, सहयोग नगर, वाडीया इस्टेट, क्रांतीनगर, हनुमान चाळ, समर्थ चाळ, टिचर्स कॉलनी, सीएसटी हायवे, कालिना ब्रीज, सांताक्रूझ, वाकोला परिसरासह माहीमसह संपुर्ण मुंबईला २६ जुलैचा पुराचा फटका बसला होता. आज या घटनेला १५ वर्षे पुर्ण होत असतानाही ढिम्म प्रशासन, सुस्त लोकप्रतिनिधीमुळे परिस्थिती फार काही सुधारलेली नाही. साफ दिसणारी मिठी नदी आजही गाळात रुतल्याने मिठी नदीकाठी राहणा-या लोकांचा जीव प्रत्येक पावसाळ्यात टांगणीला लागलेला असतो.

मंगळवारी रात्री मुंबईत धो धो पाऊस कोसळत असतानाच दुसरीकडे कुर्ल्यातल्या मिठी नदी लगत वास्तव्य करत असलेल्या क्रांतीनगरमधील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला होता. कारण त्यांना माहित होते. मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली की, पोलीस येतील. महापालिका येईल. अधिकारी धावधाव करतील. आम्हाला सुरक्षेच्या कारणात्सव लगतच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित करतील. आणि मिठीच्या पाण्याच्या पातळी ओसरली कि पुन्हा आपआपल्या घरी जाण्यास सांगतील. आणि झाले देखील तसेच. मात्र हे असे किती दिवस सुरु राहणार आहे. प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात मिठी नदीला पूर येतो आणि प्रत्येक पूरात क्रांतीनगरमधल्या रहिवाशांचे नुकसान होते. मात्र क्रांतीनगर येथील पूराचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून कोणीच प्रयत्न करत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

मुंबईतील नालेसफाईच्या कामांव्यतिरिक्त मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सबवे सह, ज्या सखल ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी उदंचन संच तैनात करण्यात आलेले आहेत. नालेसफाईनंतर ज्या-ज्या वेळेस नाल्यांमध्ये तरंगते पदार्थ आढळून आल्यास सदर तरंगते पदार्थ वेळोवेळी काढण्यात येतात, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले. मात्र असे असले तरी थोडा मुसळधार पाऊस पडला तरी कुर्ला येथील मिठी नदीच्या आसपास राहत असलेल्या नागरिकांना त्रास होतो. खुपच पाऊस झाला तर लगतच्या वस्तीत पाणी येते. मुसळधार पाऊस सलग लागून राहिला की मिठी नदीच्या पाण्याचा वेग वाढतो. पाणी एवढया वेगाने वाहते की तो वेग बघताना अंगावर काटा उभा राहतो. परिणामी सारखी सारखी येथील रहिवाशांवर स्थलांतरणाची वेळ येऊ नये, असे म्हणणे स्थानिकांचे आहे.

टॅग्स :नदीमुंबईपाऊसमुंबई मान्सून अपडेटमुंबई महानगरपालिका