Join us

पत्रास कारण की... काँग्रेसच्या नाराज २५ आमदारांचे सोनिया गांधींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:46 IST

महामंडळांवरील नियुक्त्यांवरून खदखद; दिल्लीत भेटीची वेळ मागितली

मुंबई : राज्यातील काँग्रेसच्या २५ आमदारांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची वेळ मागितली आहे. तसे पत्रच त्यांनी पाठविले असून, त्यात विविध मुद्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

कुणाल पाटील, संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे यांनी या पत्रासाठी पुढाकार घेतला. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच या पत्रासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. सूत्रांनी सांगितले की, महामंडळांवरील नियुक्त्या होत नसल्याबद्दल या पत्रात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत साध्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देता आलेली नाही, तसेच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले तेव्हा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता आणि त्यानुसारच हे सरकार चालेल असे निश्चित करण्यात आले होते. याची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याचा सूर पत्रात आहे. काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय करता येऊ शकेल याविषयी आम्हाला सूचना मांडायच्या आहेत, असेही या आमदारांनी पत्रात म्हटले आहे. 

काँग्रेसच्या राज्यातील आमदारांचा प्रशिक्षण वर्ग ४ आणि ५ एप्रिल रोजी दिल्लीत होणार आहे. त्याचदरम्यान २५ आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटीसाठी वेळ मागितली आहे.

पत्रास कारण की...nशिवसेना व राष्ट्रवादीच्या खात्यांकडून काँग्रेसच्या आमदारांना पुरेसा निधी दिला जात नाही. एवढेच नव्हे, तर काँग्रेसचे  काही मंत्री आपल्याच आमदारांकडे दुर्लक्ष करतात.nविधानसभा अध्यक्षांची निवड याही अधिवेशनात होऊ शकली नाही. तेव्हा सोनिया गांधी यांनी स्वत: पुढाकार घेऊन हा तिढा सोडवावा.

महाविकास आघाडी सरकार स्थिर असून, कोणताही धोका नाही. नाराजीच्या काही बातम्या येत आहेत, त्यात काही तथ्य नाही. काही मुद्यांवर आमदारांनी किंवा नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही. भाजपाकडून आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष-काँग्रेस

विकास कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचेही ९० टक्के आमदार नाराज आहेत. सगळे काही राष्ट्रवादीच्या वाट्याला जात असल्याने खदखद आहे. - आ. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस, भाजप

टॅग्स :काँग्रेससोनिया गांधीआमदार