Join us  

मी पुन्हा येईन... अमृता वहिनींकडून महाराष्ट्राचे आभार, व्यक्त केला 'शायराना अंदाज'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 8:46 PM

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांना शपथ देण्यात आली होती. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... असे म्हणत फडणवीस यांनी आपला शब्द खरा खरुन दाखवला. मात्र, साडे तीन दिवसांतच फडणवीस यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, आता अमृता फडणवीस यांनी शायरीतून मी पुन्हा येईन, असे म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली असून त्याजागी उद्धव ठाकरे पदभार सांभाळणार आहेत. महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथविधी घेणार आहेत. राज्यातील या राजकीय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊँटवरुन एक शायरी व्यक्त केली. शायरीतून आपला मत मांडताना पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दे... असे म्हणत मी पुन्हा येणार असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, महाराष्ट्रानं मला गेल्या 5 वर्षे वहिनी म्हणून जे प्रेम दिलं, त्याबद्दल महाराष्ट्राचे आभार. मी गेली 5 वर्षे माझी भूमिका माझ्या क्षमतेनुसार बेस्ट निभावलीय, असे अमृता यांनी म्हटलंय.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मी पुन्हा येईन... असे विधान केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत महाविकासआघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं होतं. तसेच, फडणवीसांना आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचं गणित आखलं होतं. पण, अजित पवारांच्या फुटीरतावादी खेळीनं पवारांच गणित बिघडलं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर, राज्य आणि देशपातळीतून फडणवीसांचं अभिनंदन केलं गेलं. फडणवीस यांना शुभेच्छाही देण्यात आल्या. मात्र, केवळ साडे तीन दिवसांत फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. पण, फडणवीसांनी आपला शब्द पूर्ण करून दाखवला. ते पुन्हा आलेच होते. मात्र, त्यांना लवकरच जावे लागले.  

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसफेसबुकट्विटरराजकारण