महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 07:04 IST2025-11-03T07:03:50+5:302025-11-03T07:04:16+5:30
मुंबईत आज आपण दिसतो, तेवढेही पुढील पाच वर्षात दिसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘मुंबईचा महापौर आमचाच होऊ दे,’ असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागठाणे येथील मालवणी महोत्सवात शनिवारी गाऱ्हाणे घातले. मागठाणे येथील शाखा क्रमांक १२ आणि १४च्या संयुक्त विद्यमाने मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे उपस्थित होते.
‘मला इथे आल्यानंतर २०१२ आठवले. त्यावेळी आपण देवाला साकडे घातले होते. सुनील प्रभू त्यानंतर महापौर झाले. आता पुढचे मी सांगत नाही. पण, त्याचवेळेचे गाऱ्हाणे देवाला पुन्हा घातलेले आहे आणि मला विश्वास आहे, बाकी कुणी ऐको न ऐको पण देव आपला आहे आणि देव आपले ऐकतो, असेही ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी केवळ उत्साही न राहता राजकीयदृष्ट्या जागरूक आणि सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना करतानाच सावध राहिलो नाही तर मुंबईत आज आपण दिसतो तेवढेही पुढील पाच वर्षात दिसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.