चला मुंबई करू झोपडपट्टी मुक्तचा नारा देत खासदाराची उत्तर मुंबईत संकल्प यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:03 IST2021-10-31T19:01:10+5:302021-10-31T19:03:21+5:30
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त चला मुंबई करू झोपडपट्टी मुक्त असा नारा देत भाजपने संकल्प यात्रा काढली.

चला मुंबई करू झोपडपट्टी मुक्तचा नारा देत खासदाराची उत्तर मुंबईत संकल्प यात्रा
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त चला मुंबई करू झोपडपट्टी मुक्त असा नारा देत आज सकाळी ७.३० वाजल्या पासूनच उत्तर मुंबईतील सर्व विधानसभेतून मोठा संख्येनी नागरिक रस्त्यावर उतरले होते. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी हे झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी सातत्याने प्रयत्नशील असून आपला आवाज महाआघाडी सरकार व विशेषकरून संबधित प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी उत्तर मुंबईत त्यांनी या संकल्प यात्रेचे आयोजन केले होते.
यावेळी खासदार शेट्टी म्हणाले की, आपल्या सर्वांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायची संधी मिळाली नाहीं. परंतू सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त येथील एकत्र येवून, देशाची एकता वृद्धीगत करून मुंबईत झोपडीत राहणाऱ्या नागरिकांना त्यांचा मूलभूत न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आज झोपडी मुक्त मुंबईचा नारा देत या अभियानाचे आयोजन केले आहे.
खासदार शेट्टी यांच्या झोपडपट्टी मुक्त मुंबई अभियानाला गती मिळण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खासदार शेट्टी आणि प्रशासकीय अधिकारी यांची नुकतीच संयुक्त बैठक राजभवन येथे आयोजित केली होती. यावेळी झोपडपट्टीवासियांना न्याय द्यावा आणि एसआरए प्रकल्पांना गती द्यावी असे निर्देश सुमारे दिढ तास चाललेल्या या बैठकीत उपस्थित सर्व प्रशासनिक अधिकाऱ्यांना दिले दिल्याचे त्यांनी यावेळी खास नमूद केले.
येथील सहा विधानसभेतून विविध ठिकाणांवरून निघालेली संकल्प यात्रा कांदिवली येथील कांदिवली एज्युकेशन सोसायटीच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल प्रतिमा पर्यंत सर्व बाजूंनी आलेली यात्रा पोहचली. खा. गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली पश्चिम,सरदार वल्लभभाई पटेल उद्यान,साईबाबा नगर येथे विनम्र अभिवादन केल्या नंतर मालाड पश्र्चिम लिबर्टी गार्डन स्वातंत्रवीर सावरकर शिल्प येथे आयोजित पदयात्रेत ते सहभागी झाले.
या संकल्प यात्रेत आमदार भाई गिरकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, उत्तर मुंबईचे सर्व भाजप नगरसेवक,मुंबई मुंबई चे पदाधिकारी प्रकाश दरेकर, विनोद शेलार, मुंबई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर तिवाना भाजपा झोपडपट्टी आघाडी, तसेच येथील सर्व झोपडपट्टीवासीय, महिला आघाडी, युवा आघाडी, केईएस महाविद्यालय चे विद्यार्थी मोठा संख्येने उपस्थित होते.