१२८ कॉलेजांमध्ये १०० पेक्षा कमी विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 11:59 IST2025-07-27T11:59:30+5:302025-07-27T11:59:30+5:30
तब्बल १५ महाविद्यालयांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, तर ३० महाविद्यालयांमध्ये ३० हून कमी विद्यार्थी असल्याचे चित्र आहे.

१२८ कॉलेजांमध्ये १०० पेक्षा कमी विद्यार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या तब्बल १२८ कॉलेजांमध्ये १०० पेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशित असल्याचे वास्तव समोर आले आहे, तर यातील सात महाविद्यालयांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्यातच असलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी मिळत नसताना नव्या महाविद्यालयांचे पेव सुटत आहे. त्यातून या महाविद्यालयातील शैक्षणिक गुणत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
मुंबई विद्यापीठाशी जवळपास ९१४ महाविद्यालये संलग्न आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, रागयड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांत ही महाविद्यालये आहेत. मात्र, विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांची स्थिती विदारक असून, त्यामध्ये मान्यताप्राप्त प्राध्यापक आणि प्राचार्य नाहीत. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवरही झाला आहे. यातून विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे.
तब्बल १५ महाविद्यालयांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, तर ३० महाविद्यालयांमध्ये ३० हून कमी विद्यार्थी असल्याचे चित्र आहे. ही बहुतांश महाविद्यालये पारंपरिक अशा आर्टस, कॉमर्स आणि सायन्स शाखेची आहेत. विद्यापीठातील अधिकृत कागदपत्रांवरून ही बाब समोर आली. यातील अनेक महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांना १ ते ७ विद्यार्थी असून, त्यातून महाविद्यालयांना अभ्यासक्रम चालविणेही अवघड झाले आहे. दरम्यान, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ६३० हून अधिक महाविद्यालयांमध्ये ३०० हून कमी विद्यार्थी होते.
विद्यापीठ महाविद्यालयांना संलग्नता देते. त्यांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारीही विद्यापीठाची आहे. मात्र, ही महाविद्यालये विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देऊ शकत नाहीत, याचा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये सोयीसुविधा नसतील, तसेच निकृष्ट दर्जामुळे विद्यार्थी येत नसतील, त्या महाविद्यालयांना मान्यता देऊ नये, तसेच आधीच्या महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसताना विद्यापीठाने आता नवीन महाविद्यालयांना मान्यता देऊ नये, अशी मागणी युवासेनेचे नेते आणि सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी केली.
‘व्यावसायिक’ अभावी संख्या घटली
सरकार अनुदानित महाविद्यालयांना नवीन रोजगारक्षम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देत नाही, तसेच अभ्यासक्रम अद्ययावत करू देत नाही. दुसरीकडे विनाअनुदानित अभ्यासक्रमाची महाविद्यालये फोफावली असून, त्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची फी परवडत नसली, तरी विद्यार्थ्यांना तिकडे प्रवेश घ्यावा लागतो. त्यातच बृहत आराखडा बारावीचे विद्यार्थी संख्येवरून ठरविला जात नाही. सरकार राजकीय सोयीसाठी आवश्यकता नसताना ग्रामीण भागात १० किमीच्या अंतरात अनेक महाविद्यालयांना मान्यता देते. त्यातून कोणत्याही महाविद्यालयाला विद्यार्थी मिळत नाहीत, असे सिनेट सदस्य आणि बुक्टूचे सचिव प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सांगितले.