"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:55 IST2025-07-17T13:44:38+5:302025-07-17T13:55:21+5:30
राज्यातील गुटखाबंदीवरुन विधान परिषदचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी महायुती सरकावर टीका केली

"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
Shrikant Bhartiya on Gutka Ban: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी महायुती सरकारचेच वाभाडे काढले. राज्यात राजरोसपणे गुटक्याची विक्री सुरु असल्याचे म्हणज श्रीकांत भारतीय यांनी संताप व्यक्त केला. राज्यात गुटखाबंदी आहे असं म्हणणं हास्यास्पद असल्याचेही श्रीकांत भारतीय म्हणाले. महाराष्ट्रात गुटखा बंदी असली तरी मोठ्या प्रमाणात त्याची सर्रासपणे विक्री होताना दिसतेय. यावरुनच आमदार श्रीकांत भारतीय यांनी सरकारव टीका केली. तसेच सर्वात आधी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी श्रीकांत भारतीय यांनी केली.
गुटखाबंदीवरुन भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी सरकारला घरचा आहेर दिला. गुटखाबंदी असतानाही राज्यात कुठल्याही कोपऱ्यात सहजपणे गुटखा मिळतो. त्यामुळे आता गुटखा विक्री करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेत वाढ करायला हवी असंही श्रीकांत भारतीय म्हणाले. महिन्याभराच्या कालावधीत ५३ ठिकाणी ३ कोटींपेक्षा अधिक किमतीचा गुटखा पकडला गेल्याचेही मंत्री नरहरी झिरवळ यांनी मान्य केलं आहे.
"गुटखा, पानमसालाची सर्रासपणे विक्री होतं असं म्हटल्यावर संबधित खात्याचे मंत्री म्हणतात असं निदर्शनास आलंच नाही. त्यानंतर लगेच म्हणतात महिन्याभराच्या कालावधीत ३ कोटी २० लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा पकडला गेला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा गुटख्याची पाकिटं तुम्हाला दिसतील. हे येतात कुठून? गुटखा विक्री करणाऱ्यांचे एक नेटवर्क आहे. याप्रकरणी फक्त खालच्या माणसांवर कारवाई केली जाते. राज्यात गुटखाबंदी आहे असं म्हणणं हास्यास्पद आहे," असं आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले.
दरम्यान, राज्यामध्ये गुटखा विक्रीला पूर्णपणे बंदी असतानाही परराज्यातून गुटखा आणून त्याची सर्वत्र विक्री होते. तरीही संबंधित अधिकारी कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत, अशी तक्रार केली जात आहे.