'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 06:08 IST2025-10-21T06:06:20+5:302025-10-21T06:08:44+5:30
बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते.

'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय सिनेसृष्टीतील माइलस्टोन ठरलेल्या ‘शोले’ चित्रपटातील ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं...’ या गाजलेल्या डायलॅागमुळे प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिलेले ज्येष्ठ अभिनेते असरानी म्हणजेच गोवर्धन असरानी (८४) यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. जुहूतील आरोग्य निधी रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. सांताक्रूझमधील शास्त्री नगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील चतुरस्र अभिनेते गोवर्धन असरानी मूळचे राजस्थानमधील जयपूरचे रहिवासी होते. 'मेरे अपने' या चित्रपटातील लक्षवेधी व्यक्तिरेखेमुळे ते प्रकाशझोतात आले. त्यांनी विनोदी कलाकाराच्या रूपात वेगळी ओळख निर्माण केली.
पुण्यात अभिनयाचे प्रशिक्षण
असरानी यांनी १९६२ मध्ये सिनेसृष्टीत काम करण्यासाठी मुंबई गाठली. १९६४ मध्ये पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. १९६६ मध्ये अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले.
गाजलेले चित्रपट : बावर्ची, नमक हराम, घर परिवार, कोशिश, परिचय, अभिमान, महबूबा, पलकों की छाँव में, दो लड़के दोनों कड़क़े, बंदिश, आज की ताज़ा ख़बर, रोटी, प्रेम नगर, चुपके चुपके, छोटी सी बात, रफू चक्कर, शोले, बालिका बधू, फकीरा, अनुरोध, छैला बाबू, चरस, दिल्लगी, हीरालाल पन्नालाल, आदी.