दडपशाही करुन भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा डाव; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 12:59 PM2019-08-09T12:59:28+5:302019-08-09T13:00:26+5:30

गुजरातमधून हाकलून दिलेले उत्तरप्रदेश बिहारची लोकं महाराष्ट्रात आली. आणि हे आंदोलन करणारा अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करतो आणि आपल्यावर केसेस टाकतात. 

Left to suppress Maharashtra in future; Criticism of Raj Thackeray | दडपशाही करुन भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा डाव; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

दडपशाही करुन भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा डाव; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

googlenewsNext

मुंबई - काश्मीरमध्ये ३७० कलम हटवायचं म्हणून इंटरनेट बंद केलं गेलं, टीव्ही बंद केले गेले, कर्फ्यू लावला गेला. उद्या असंच महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ ह्यांच्याबाबतीत घडू शकतं आणि हे का घडतंय तर बहुमताच्या जोरावर हे सगळं केलं जातंय त्यामुळे सतर्क राहणं गरजेचे आहे असं आवाहन राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी मेळाव्यात केलं. 

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आज राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रेल्वे भरतीसाठी २००८-०९ ला आंदोलन केलं तेंव्हा आपल्यावर केसेस टाकल्या गेल्या, पण असंच आंदोलन गुजरात मध्ये झालं तेंव्हा गुजरातमधून हाकलून दिलेले उत्तरप्रदेश बिहारची लोकं महाराष्ट्रात आली. आणि हे आंदोलन करणारा अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करतो आणि आपल्यावर केसेस टाकतात. 

काल नरेंद्र मोदी म्हणाले की ३७० कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, पण अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे, मग तिथे गेल्या ५ वर्षात रोजगार का निर्माण करू नाही शकलात? गेल्या ४५ वर्षातला बेरोजगारीचा आकडा सध्या सगळ्यात जास्त आहे असा आरोप राज यांनी केंद्र सरकारवर केला. 

तसेच देश आर्थिक गर्तेत चालला आहे पण मोदी भक्तांचं लक्ष नाही,ते सध्या आनंदात आहे,त्यांच्यावर जेव्हा ह्या आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळेल तेंव्हा कळेल. ह्या आर्थिक अडचणींकडे लक्ष जाऊ नये म्हणून समान नागरिक कायदा, राम मंदिर मुद्दे पुढे आणून तुमचं लक्ष विचलित करायचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात १४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जवळपास ६ लाख मध्यम उद्योग बंद पडलेत.आणि हे सगळं झालं एका माणसाला आलेल्या नोटबंदीच्या झटक्यामुळे झालं, जीएसटी आणला पण केंद्राकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे महापालिकांना पैसा नाही, मग शहरं चालणार कशी ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 



 

मी मध्यंतरी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधींची भेट घेतली, ममता बॅनर्जींची भेट घेतली, त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे हे ह्या दोन्ही नेत्यांना सांगितलं. त्यांनी देखील हा धोका मान्य केला. त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्या सोबत आहोत. राजकीय पक्ष प्रचार करणार, सभा घेणार, पैसे खर्च करणार आणि तरीही जर भाजप ईव्हीएमच्या जोरावर मतदान हवं तसं फिरवणार असेल तर राजकीय पक्ष कशा निवडणूक लढवणार असंही राज ठाकरे यांनी सांगितले. 
 

Web Title: Left to suppress Maharashtra in future; Criticism of Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.