काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 05:38 IST2024-12-21T05:38:25+5:302024-12-21T05:38:48+5:30
उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी निरीक्षकांची बैठक बोलावली आहे. यानंतर ठाकरे प्रत्येक शाखेला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका
महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी अनेक जुन्या शिवसैनिकांना आवडलेली नाही. त्यामुळे काँग्रेसची साथ सोडून मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्यात याव्यात, अशी भूमिका मुंबईतील गटप्रमुखांनी शिव सर्वेक्षण यात्रेदरम्यान मांडली आहे. तसेच, विधानसभेत लाडकी बहीण मुद्दा प्रभावी ठरल्याची कबुली त्यांनी दिली आहे, अशी माहिती उद्धवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेकडून मुंबईमध्ये शिव सर्वेक्षण यात्रा सुरू करण्यात आली आहे. ३६ विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाने ३६ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निरीक्षकांनी वॉर्डनिहाय गटप्रमुख, शाखाप्रमुख, माजी नगरसेवक यांच्याशी विधानसभेत काय चुकले आणि महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी काय करावे लागेल? तसेच, पक्षांतर्गत कुरबुरी आणि चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे ते म्हणाले.
महायुतीने सुरू केलेल्या लाडक्या बहिणीचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसून आला. प्रचारादरम्यान, तुमचे सरकार आल्यास पैसे देणार आहेत. पण, ज्यांनी सुरुवात केली आहे त्यांना मते का देऊ नये, अशी विचारणा जनतेने केली होती. काँग्रेस सोबत असल्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडता आला नसल्याची कबुली काही गटप्रमुख, शाखाप्रमुखांनी निरीक्षकांना दिली, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघांतील २५० हून अधिक मतदारसंघात शिव सर्वेक्षण यात्रा केली होती. पक्षाने २१ निरीक्षक नेमून त्यांच्याकडे दोन लोकसभा मतदारसंघातील १२ विधानसभांची जबाबदारी दिली होती. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची नावे निरीक्षकांनी अहवालात दिली होती. निरीक्षकांची मते जाणून न घेता दुसऱ्यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा पक्षाला मोठा फटका बसला याकडेही या पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले.
उद्धव ठाकरे संवाद साधणार!
पक्षामधील घडामोडी जाणून घेण्यासाठी निरीक्षक पाठविले जातात. त्यांच्याकडून अहवाल मागविला जातो. मात्र, त्यावर पक्षाचे नेते काय निर्णय घेतात? तो अहवाल पक्षप्रमुख यांच्यापर्यंत पोहोचतो की नाही याची काहीच माहिती मिळत नव्हती. मात्र, यावेळी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा अहवाल पाहणार आहेत. यासाठी त्यांनी शनिवारी मातोश्री निवासस्थानी निरीक्षकांची बैठक बोलावली आहे. यानंतर ते प्रत्येक शाखेला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.