गळती, चोरी करतेय शुद्ध पाण्याचा घात; महापालिका करते १२ ते १५ रुपये खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 01:08 AM2020-12-31T01:08:16+5:302020-12-31T01:08:22+5:30

महापालिका करते १२ ते १५ रुपये खर्च; २७ जलाशयांमार्फत मिळते मुंबईकरांना पाणी

Leaking, stealing pure water | गळती, चोरी करतेय शुद्ध पाण्याचा घात; महापालिका करते १२ ते १५ रुपये खर्च

गळती, चोरी करतेय शुद्ध पाण्याचा घात; महापालिका करते १२ ते १५ रुपये खर्च

Next

मुंबई : मुंबईला हजार लीटर पाणी केवळ सव्वाचार रुपयांत मिळते. महापालिका याकरिता १२ ते १५ रुपये खर्च करते. पाणीपुरवठा असलेल्या जलस्रोतांतून दररोज पाणी जवळपास ४०० किलोमीटर्स लांबीच्या जाळ्याद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणले जाते. पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर हे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्र, पांजरापूर येथे साठवले जाते.  त्यानंतर २७ जलाशयांमार्फत पाण्याचे शहर आणि उपनगरांत वितरण केले जाते.

मात्र नेमके हे पाणी वितरित होताना जेथे जलवाहिन्या गळक्या आहेत, फुटलेल्या आहेत तेथून अशुद्ध पाणी या जलवाहिन्यांमध्ये शिरते. परिणामी झोपड्या, चाळी, इमारती अशा बहुतांश वस्त्यांमध्ये अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने गळती आणि पाणीचोरीकडे विषेश लक्ष द्यावे, असे म्हणणे जलतज्ज्ञ सातत्याने मांडत आहेत.

मुंबईत गरिबी-श्रीमंतीचा भेद पाण्याच्या वितरणात स्पष्टपणे जाणवतो, अशी टीका पाणी हक्क समिती सातत्याने करत आहे. झोपड्यांत राहत असलेल्या प्रत्येक नागरिकाला पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, असे स्पष्ट म्हणणे मांडते. मात्र ते मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी  दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दुषित पाण्यामुळे डायरिया, कॉलरा, काविळ यासारखे साथीचे आजार पसरतात. पावसाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. लहान मुलांमध्ये त्वचेचे विकार, खरुज यासारखे आजार आढळतात.

वस्त्यांमध्ये पाण्यासाठी रांग लावणे, पाणी भरणे यासारखी जबाबदारी लहान मुले पार पाडतात. याचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. पाणी येण्याची वेळ रात्री-अपरात्री असल्याने पुरेशी झोप मिळत नाही. त्यातून मानसिक आजार बळवितात. पाण्याच्या कमतरतेमुळे वाटपावेळी संघर्ष निर्माण होतात. शारीरिक दुखापती होतात.

गरीब वस्त्यांमध्ये जलजोडणी घेतल्यानंतर दोन-चार महिने पाणी व्यवस्थित येते. मात्र कालांतराने पाण्याचा दाब कमी होतो; आणि त्यानंतर पाणीच येत नाही. आणि असे असतानासुद्धा पाण्याचे बिल मात्र दाखल होते.जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शिकेप्रमाणे प्रत्येक माणसाला आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. पिण्यासाठी व जेवणासाठी कमीत कमी २० लीटर शुद्ध आणि सुरक्षित पाणी प्रत्येक माणसाला मिळणे गरजेचे आहे. 

प्रत्येकाला पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी मिळणारे पाणी हे सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यात जीवजंतू, घातक रसायने आणि किरणोत्सर्गाचा समावेश नसावा. पिण्यासह घरगुती वापरासाठी असलेल्या पाण्याला असणारा रंग, चव, गंध हा पाणी पित असलेल्या स्वीकारार्ह असावा. पाणी वितरणात भेदभाव नसावा. कामाच्या ठिकाणी, संस्थांमध्ये सुरक्षित, स्वीकारार्ह पाणी सहज सुलभ मिळावे. मुंबईत विदारक स्थिती आहे.

Web Title: Leaking, stealing pure water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.