Join us

गांजा विक्रीचा बादशहा ‘लक्ष्मीभाई’ जाळ्यात ; महिन्यात देशात दोन टनांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 09:05 IST

देशातील प्रमुख गांजा वितरक आणि महाराष्ट्रातील गांजा विक्रीतील बादशहा म्हणून ओळख असलेला लक्ष्मीकांत रामा प्रधान उर्फ लक्ष्मीभाई अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे.

मुंबई : देशातील प्रमुख गांजा वितरक आणि महाराष्ट्रातील गांजा विक्रीतील बादशहा म्हणून ओळख असलेला लक्ष्मीकांत रामा प्रधान उर्फ लक्ष्मीभाई अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. लक्ष्मीभाई यास साथीदारासह ओडिशातून बेड्या ठोकल्या आहेत. महिनाभरात त्याने दोन टन गांजाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी विभागाचे पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. १२ डिसेंबर २०२१ रोजी घाटकोपर कक्षाने विक्रोळीतून साडेतीन कोटींचा १,८२० किलो गांजा जप्त केला होता. या कारवाईत तस्कर आकाश सुभाष यादव, दिनेशकुमार सजीवन सरोज याला अटक झाली. टोळीचा सदस्य संदीप भाऊ सातपुते हा मुंबई, ठाणे, विरार, पालघर येथे गांजाची विक्री करत होता. त्यालाही २३ जून २०२१ रोजी अटक केली होती. तिन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात १० ऑगस्ट २०२१ रोजी दोषारोपपत्र सादर केले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. टोळीचा म्होरक्या लक्ष्मीकांत रामा प्रधान व त्याचा साथीदार बिद्याधर बूंदाबन प्रधान हे फेब्रुवारी २०२१ पासून ओडिशा, तेलंगणा,  हैदराबाद, नेपाळ येथे ओळख लपवून राहत होते. प्रधान ओडिशामध्ये असल्याचे समजताच सुतार यांच्या नेतृत्वात पथकाने सापळा रचला. दोन वेळा प्रयत्न फसले.

देशभरात मालमत्ता

 प्रधान हा स्थानिक टेम्पो चालकांना हाताशी धरून नारळ, कांदा तसेच विविध वस्तूंच्या आडून गांजाची तस्करी करत होता.

  त्याची ३ बँक खाती गोठविण्यात आली आहेत. झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह देशातील त्याच्या मालमत्तेबाबत गुन्हे शाखा माहिती घेत आहे.

 नक्षलग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीने शेतीचे कामे पूर्ण होताच ही टोळी ओडिशातून मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये  गांजा विक्री करायची.

हवालाच्या माध्यमातून गांजा विक्री

लक्ष्मीकांत रामा प्रधान उर्फ लक्ष्मीभाईविरोधात नवघर, ओडिशामध्ये चार गुन्हे, तर त्याच्या साथीदाराविरुद्ध ३ गुन्हे नोंद आहेत. या टोळीने एका महिन्यात सुमारे दोन टन गांजाची गुजरात, महाराष्ट्रात विक्री केली. गांजा विक्रीतील पैशांचा व्यवहार रोखीने तसेच हवालाच्या माध्यमातून केला जात होता. ही टोळी ओडिशातील गंजम जिल्ह्यामधून गांजाचा पुरवठा करत होती.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस