विमानतळाच्या टर्मिनल दोनवर प्रीपेड रिक्षा सुरू करा, रिक्षा संघटनांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:12 IST2020-03-05T00:11:58+5:302020-03-05T00:12:12+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर आलेल्या प्रवाशांना शहरात किंवा शहराजवळ जाण्यासाठी प्रीपेड रिक्षा सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

विमानतळाच्या टर्मिनल दोनवर प्रीपेड रिक्षा सुरू करा, रिक्षा संघटनांची मागणी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर आलेल्या प्रवाशांना शहरात किंवा शहराजवळ जाण्यासाठी प्रीपेड रिक्षा सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. टी २ वर याबाबतची सेवा उपलब्ध करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. फेडरेशन आॅफ आॅल इंडिया एव्हिएशन व त्यांच्याशी संलग्न असलेल्या सेवा सारथी आॅटो रिक्षा टॅक्सी अॅण्ड ट्रान्सपोर्ट युनियन व मुंबई उपनगर रिक्षाचालक संघ या संघटनांतर्फे ही मागणी करण्यात आली आहे. याबाबत एव्हिएशनचे अध्यक्ष प्रदीप मेनन यांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडला पत्र पाठवले आहे.
विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी टी २ वर प्रीपेड रिक्षा सेवा उपलब्ध झाल्यास त्यांना चांगली सेवा मिळेल व सध्या त्यांना रिक्षा मिळण्यासाठी करावी लागणारी धावपळ टळेल, असे मेनन म्हणाले. सध्या प्रवाशांना दीर्घ प्रवास करून आल्यानंतर रिक्षा मिळवण्यासाठी मोठी रांग लावावी लागते. अनेकदा त्यांना प्रमाणापेक्षा जास्त शुल्क द्यावे लागते. अनेकदा प्रवाशांना स्थानिक रिक्षाचालकांची मराठी किंवा हिंदी भाषा कळत नाही. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. काही रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते, त्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांनाही त्याचा फटका बसतो. रिक्षाचालकांची प्रतिमा अशा प्रकारामुळे मलीन होते, मुंबई शहराचे नावही खराब होते. या सर्व प्रकारांपासून वाचण्यासाठी व प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी विमानतळ प्रशासनाने टी २ व प्रीपेड रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी व त्यासाठी याबाबत लवकर सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्याची मागणी अध्यक्ष प्रदीप मेनन व उपाध्यक्ष किशोर चित्राव, सनी फिलीप्स यांनी केली आहे.