Join us

भाजपा युवा मोर्चाच्या 'एक सही भविष्यासाठी' अभियानाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:26 IST

आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या आवारातून 'एक सही भविष्यासाठी' अभियानाची सुरुवात झाली.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी युवक आणि नवीन भारताच्या भविष्यासाठी काम करतात. याच अनुषंगाने 'एक सही भविष्यासाठी' या अभियानांतर्गत मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडे जात मोदी सरकारने केलेले काम पारदर्शकपणे मांडून त्यावर युवकांच्या सूचना घेण्यात येतील. हे अभियान विद्यार्थी आणि त्यांचे भविष्य घडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला. आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या आवारातून 'एक सही भविष्यासाठी' अभियानाची सुरुवात झाली.

आशिष शेलार म्हणाले, खऱ्या अर्थाने अन्य पक्ष जेव्हा राजकारणापुरते राजकारण करत आहेत. एकमेकांना कुरघोड्या, आलोचना करत आहेत. विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादी, उद्धवजींची शिवसेना, मनसे ही जन हितापेक्षा राजकीय हिताचे काम करतात. त्यावेळी आम्हाला गर्व आणि आणि अभिमान आहे की, भारतीय जनता पक्षाचे नेते, जनहिताचे काम करतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिल्यांदाच आयआयएम सुरू होत असून ३५०  एमबीए विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. 

आता मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील तरुणांना राज्याबाहेर जाण्याची गरज नाही. वर्षानुवर्षाची ही मागणी पूर्ण होते आहे. त्याबरोबर आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांची सोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांनी  वैद्यकीय पदवीधर जागा वाढवल्या. मेडिकलच्या पदव्युत्तर जागांमध्ये वाढ केली. देशात ३९ टक्क्याने विद्यापीठांची संख्या वाढवली. या अशा सर्व प्रकारातून भारताचे भविष्य उज्वल करण्याचं काम पंतप्रधान करत आहेत. त्याला युवकांचं जनसमर्थन आणि सूचना आम्ही घेत आहोत, असेही शेलार म्हणाले. यावेळी मुंबई भाजयुमो अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :भाजपाआशीष शेलार