Join us  

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच आरक्षण लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 2:49 PM

यंदाच्या वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू; हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : मराठा समाजातील वैद्यकीयशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी एसईबीसीअंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. प्रवेश प्रक्रिया जरी आधी सुरु झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते, त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारला आहे.

दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मराठा आरक्षण लागू करू नये. २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू करावे, यासाठी राज्य सरकारने एसईबीसी कायद्यात केलेली सुधारणा अवैध ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका एमबीबीएसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. 

याचिकेनुसार, एमबीबीएसची प्रवेश प्रक्रिया १ नोव्हेंबर, २०१८ पासून सुरू झाली. त्यानंतर, राज्य सरकारने एसईबीसी कायदा मंजूर केला. एमबीबीएसच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एसईबीसी कायद्यानुसार प्रवेश दिला जाणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने दिले, परंतु मार्च महिन्यात राज्य सरकारने एमबीबीएस व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एसईबीसी कायद्यानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणे बंधनकारक केले. 

या निर्णयाला वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे आव्हान दिले. त्यावर नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दणका देत, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी हा कायदा लागू होत नाही, असे स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही राज्य सरकारला दिलासा देण्यास नकार दिला. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून, राज्य सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एसईबीसी कायद्याच्या १६ (२) तरतुदीत सुधारणा करून, २०१९ -२० या शैक्षणिक वर्षापासूनच एमबीबीएस व वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत १६ टक्के मराठा आरक्षण देण्याची तरतूद केली, असे याचिकेत म्हटले होते.

उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करणे बेकायदेशीर आहे, तसेच पूर्वलक्षित प्रभावाने कायदा लागू करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर, २०१८ पासून एमबीबीएससाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आणि कायदा ३० नोव्हेंबरनंतर मंजूर करण्यात आला.

त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेत १६ टक्के आरक्षण लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आहे आणि त्या अनुषंगाने एसईबीसी कायद्याचे सुधारित कलम १६ (२) हे अवैध आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.यंदाच्या वर्षापासून या सुधारित कलमानुसार एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेत १६ टक्के मराठा आरक्षण लागू करू नये, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात केली होती. 

टॅग्स :मराठा आरक्षणवैद्यकीयशिक्षणमहाराष्ट्र