‘बंद’मुळे लाल परीला अडीच कोटींचा फटका; राज्यभरात ६ हजार २०० फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 06:41 IST2023-09-05T06:41:14+5:302023-09-05T06:41:27+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर शुक्रवारी लाठीचार्ज झाला होता.

‘बंद’मुळे लाल परीला अडीच कोटींचा फटका; राज्यभरात ६ हजार २०० फेऱ्या रद्द
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुकारलेल्या बंदचा फटका राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) बसला असून ६ हजार २०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने २ कोटी ६० लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. आतापर्यंत महामंडळाला १३ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर शुक्रवारी लाठीचार्ज झाला होता. त्या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसात एसटीच्या २५० आगारांपैकी ४६ आगार पूर्णतः बंद आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यामध्ये बंदचा प्रभाव अधिक आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलनात एसटीच्या २० बस पूर्णता जळाल्या, तर १९ बसची तोडफोड झाली आहे. यामुळे एसटीचे सुमारे ५ कोटी २५ लाखांचे नुकसान झाले. तर तिकीट विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाच्या आठ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.