केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माधवबाग येथील ‘श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या जयंतोत्सव’ कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं.
“अमित शाह यांच्यासोबत माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शनाचा लाभ घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. या मंदिराची स्थापना १८७५ साली झाली असून मंदिराला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. हे मंदिर केवळ दगड-विटांची वास्तू नसून प्रत्यक्षात येथे देवाचा वास आहे. त्यामुळेच येथे अखंडित सेवेचं कार्य सुरू आहे. गोसेवा असो किंवा समाजसेवा, माधवबागने नेहमीच पुढाकार घेतला आहे" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० व्या जयंतोत्सवानिमित्त मंदिरासाठी दान केलेल्या दानशूर व्यक्तींचं स्मरण केलं. यावेळी माधवबाग परिवाराचे कार्य अखंडपणे सुरू राहावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात मदतीची गरज भासल्यास आम्ही सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असंही सांगितलं आहे.