मुंबई - कुर्ला येथे बेस्टबसचालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. यातील बस चालक संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर पोलिसांनी चालकाची मेडिकल चाचणी केली. अपघातग्रस्त बसचा चालक नशेत धुंद होता असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. परंतु तो दारुच्या नशेत नव्हता असं पोलिसांचे म्हणणं आहे. आज दुपारी २ वाजता बसचालकाला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
बेस्ट बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का याचा तपास केला जात आहे. पोलीस तपासात समोर आलंय की, संजय मोरे यांनी १ डिसेंबरलाच चालक म्हणून बेस्टमध्ये नोकरी सुरू केली होती. सोमवारी रात्री १० वाजता ३३२ नंबरची बस घेऊन ते जात होते तेव्हा आंबेडकर नगर परिसरात त्यांचं बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने अनेक वाहनांना उडवत लोकांनाही चिरडले. जवळपास ४९ लोक या अपघातात जखमी झाले आहेत तर ६ लोक मृत्यूमुखी पडलेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपी चालक संजय मोरे याच्याकडून अवजड वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला आहे. मोरेला अन्य वाहनांसह मिनी बस चालविण्याचा अनुभव होता. पण, इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नव्हता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यामुळे आरोपी चालक मोरेची नियुक्ती करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पोलीस चौकशी करणार आहेत.
राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर
या दुर्घटनेची दखल घेत राज्य सरकारने अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख होत आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो असेही त्यांनी म्हटलं. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
"चालक घाबरला अन् त्याने..."
बेस्टच्या ३३२ क्रमांकाच्या बस चालकाने बसवरील नियंत्रण सुटून रस्त्यावरील अनेक वाहने आणि लोकांना चिरडले. एका सोसायटीची भिंत तोडून नियंत्रणाबाहेर गेलेली बस शेवटी थांबली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, तर ४९ जण जखमी झालेत. नियंत्रणाबाहेर गेलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी बस चालकाने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचे म्हटलं आहे. या भीषण घटनेनंतर आमदार दिलीप लांडे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती घेतली. कुर्ला स्टेशनवरून निघालेल्या बसचा ब्रेक निकामी झाला आणि चालकाचा बसवरील ताबा सुटला. चालक घाबरला आणि त्याने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबला ज्यामुळे गाडीचा वेग आणखी वाढला. त्यामुळे बस अनियंत्रित झाली. त्यामुळे बसने रस्त्यावरील लोकांना धडक दिली अशी माहिती दिलीप लांडे यांनी दिली.