Kurla Best Bus Accident : कुर्ल्यात सोमवारी रात्री बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर ही बस वर्दळीच्या ठिकाणी घुसली आणि वाहनांसह नागरिकांना चिरडत गेली. त्यानंतर एका इमारतीच्या भिंतीला धडकल्यानंतर ही बस थांबली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बसचालक संजय मोरेला अटक केली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचा दावा आरोपी चालकाने केला आहे. मात्र ईलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नसल्याचे म्हटलं जात आहे. तसेच चालक मोरेने मद्यपान केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. मात्र संजय मोरे यांच्या कुटुंबियांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
३३२ क्रमांकाची ही कुर्ला रेल्वे स्थानकावरून साकीनाका येथे जात होती. दरम्यान एल बी एस मार्गावर येताच चालक संजय मोरे यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने अनेकांना धडक दिली. बेस्ट बसच्या धडकेत दुचाकी, रिक्षा, इको व्हॅन,पोलीस जीप, टॅक्सी अशा वाहनांचे नुकसान झालं तर ४९ जण जखमी झाले. तर सात जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, संजय मोरे यांनी १ डिसेंबरलाच चालक म्हणून बेस्टमध्ये नोकरी सुरू केली होती. तसेच मोरेला अन्य वाहनांसह मिनी बस चालविण्याचा अनुभव होता. पण, इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नव्हता, असे म्हटलं जात आहे. या सगळ्या आरोपांवर मोरे कुटुंबियांनी प्रतिक्रिया देताना शंका उपस्थित केली आहे.
एबीपी माझाच्या वृत्तानुसार संजय मोरे यांचा मुलगा दीप मोरेने सांगितले की, वडिलांकडून याआधी कुठलाही अपघात घडलेला नाही. "माझे वडील नशा करुन गाडी चालवत होते या सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत. ते कधीही नशापाणी करत नाहीत. त्यांच्याकडे १९८९ पासून गाडी चालवण्याचे लायसन्स आहे. त्यांनी १ डिसेंबरपासून ही बस चालवायला घेतली होती हे अत्यंत खोटं आहे. गेल्या तीन वर्षांपासून लॉकडाऊननंतर माझे वडील बेस्टमध्ये कंत्राटी कामगार म्हणून रुजू आहेत. एवढ्या वर्षात त्यांच्याकडून कधीही अशा प्रकारचा अपघात किंवा कोणालाही नुकसान करण्याची घटना घडली नाही. कोणाला नुकसान करण्याचा त्यांचा कधीही हेतू नव्हता. काल जे काही झालं आहे ते १०० टक्के गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे झालं आहे हे माझं ठाम मत आहे," असं संजय मोरे यांच्या मुलाने सांगितले.
"अपघातग्रस्त बस गेल्या १० -१५ दिवसांपासून त्यांच्या हातात होती. ती बस हातात घेण्यापूर्वी त्यांच्याकडे छोटी बस होती. ती कंपनी बंद झाल्यानंतर ही मोठी इलेक्ट्रिक बस ट्रेनिंग घेऊन त्यांना देण्यात आली. कमीतकमी नऊ ते दहा दिवस त्यांची प्रॅक्टिकल घेतले जायचे. त्यांच्याकडून ही गाडी चालवून घेतली होती. गाडी असताना बाजूला प्रशिक्षित चालक त्यांच्या बाजूला होता. एवढ्या दिवसांत कधी अपघात झाला नाही. पण नेमका कालच कसा झाला?," असा सवाल संजय मोरे यांच्या मुलाने विचारला आहे.