"मला डिलिस्ट करू नका, नाहीतर..."; दोन पानी पत्र लिहीत बुक माय शोला कामराने सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:20 IST2025-04-07T19:20:03+5:302025-04-07T19:20:16+5:30
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने बुक माय शोला पत्र लिहीलं आहे.

"मला डिलिस्ट करू नका, नाहीतर..."; दोन पानी पत्र लिहीत बुक माय शोला कामराने सुनावलं
Kunal Kamra on BookMyShow: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबनात्मक गाणं तयार करुन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कुणाल कामराच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती. याप्रकरणी कुणाल कामराविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. दुसरीकडे, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. मात्र आता कुणाल कामराने ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म बुक माय शो विरोधात मोहिम उघडली आहे. बुक माय शोने कुणाल कामराचा कॉन्टेट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आणि त्याचे नाव कलाकारांच्या यादीतूनही हटवलं. त्यानंतर आता कुणाल कामराने बुक माय शोवर निशाणा साधला आहे.
कुणाल कामराने सोमवारी दोन पानांचे पत्र लिहीत बुक माय शोला जाब विचारला आहे. कामराने बुक माय शोला त्याच्या शोसाठी गोळा केलेल्या प्रेक्षकांची ृ माहिती मागितली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केल्याने हा संपूर्ण वाद निर्माण झाला. कुणाल कामराने 'दिल तो पागल है' या गाण्याचे विडंबन करुन एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता.
"मला माहित आहे की तुम्हाला राज्याशी चांगले संबंध ठेवावे लागतील. मुंबई हे लाइव्ह एंटरटेनमेंटचे मोठे केंद्र आहे हे देखील समजण्यासारखे आहे. राज्याकडून पाठिंबा न मिळाल्यास कोल्डप्ले आणि गन्स एन रोझेस सारखे आयकॉनिक सारखे शो करणे फक्त स्वप्नच राहिल. पण आत्ताचा मुद्दा हा नाही की तुम्ही मला डिलिस्ट करू शकता किंवा नाही. मुद्दा असा आहे की शोची यादी करण्याचे खास अधिकार तुमच्याकडे आहेत. कलाकारांना त्यांच्या वेबसाइटवर शो लिस्ट करण्याची परवानगी न देऊन, तुम्ही मला २०१७ ते २०२५ या कालावधीत मी सादर केलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले आहे," असं कुणाल कामराने म्हटले.
"तुम्ही शो लिस्ट करण्यासाठी आमचा १० टक्के महसूल कापता. पण मुद्दा असा आहे की विनोदी कलाकार लहान असो वा मोठा त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जाहिरातींवर दररोज ६,००० ते १०,००० रुपये खर्च करावे लागतात. याचा अतिरिक्त भार आम्हा कलाकारांना सहन करावा लागतो. आता तुम्ही म्हणाल की डेटा प्रोटेक्शनचा प्रश्न आहे. पण खरा प्रश्न हा आहे की कोणता डेटा कोणाकडून संरक्षित केला जात आहे. हा मोठा चर्चेचा विषय आहे," असंही कुणाल कामरा म्हणाला.
"मी जे विचारत आहे ते सोपे आहे: कृपया माझ्या सोलो कार्यक्रमांमधून तुम्ही गोळा केलेल्या प्रेक्षकांची संपर्क माहिती मला द्या जेणेकरून मी माझे जीवन सन्मानाने जगू शकेन. मी स्वतःसाठी उदरनिर्वाह करू शकतो. सोलो कलाकार म्हणून, विशेषत: कॉमेडीच्या जगात, आम्ही शो आणि प्रोडक्शन दोन्ही स्वतःच करतो. जर मी पुणे कॉमेडी फेस्टिव्हलमध्ये इतर ३० कलाकारांसोबत परफॉर्म केले असेल तर त्याला कॉमेडीचा कलेक्टिव डेटा म्हटले जाईल. पण माझ्या सोलो शोचे लोक माझे प्रेक्षक आहेत. तुम्ही मला हटवल्यास, किमान मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तरी मी प्रयत्न करेन. म्हणून, माझी विनंती आहे की एकतर मला डिलिस्ट करू नका किंवा मला माझ्या प्रेक्षकांचा डेटा द्या," अशी मागणी कामराने केली आहे.