Join us
Daily Top 2Weekly Top 5

"संविधानाने जेवढा अधिकार दिलाय त्याचा..."; कुणाल कामराच्या वादावरुन अजित पवारांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:35 IST

कुणाल कामराच्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर बोलताना विचार करुन बोलावं असं म्हटलं.

Ajit Pawar On Kunal Kamra: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाण तयार केल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल कामराच्या या गाण्यामुळे शिंदेंचे शिवसैनिकही चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी खारमधील एका क्लबची तोडफोड देखील केली. त्यामुळे आता कुणाल कामरा चांगलाच अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे, कामराच्या या प्रकरणावरुन विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर बोलताना विचार करुन बोलावं असं म्हटलं आहे.

कॉमेडिअन कुणाल कामराने त्याच्या एका गाण्यातून अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये एका शोमध्ये कुणाल कामराने हे गाणं गायलं होतं. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिंदेसेनेच्या शिवसैनिकांनी क्लबची तोडफोड केली. शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे. या वादावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलाय पण विचार करुन बोललं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर कुणाल कामरावर कायद्यानुसार कठोर कारवाई होईल, त्याचा शोध घेणं सुरु असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं.

"खरं तर कायदा, संविधान आणि नियम याच्या बाहेर कुणीच जाऊ नये. तुम्हाला मला जनतेला संविधानाने जेवढा अधिकार दिला आहे त्याचा वापर करुन बोललं पाहिजे. प्रत्येकाची वक्तव्ये वेगवेगळी असू शकतात. विचारधारा वेगवेगळी असू शकते. मतमतांतर असू शकतं. पण ते मांडतांना आणि त्याची चर्चा होताना त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होऊन पोलीस खात्याला वेगळी कायदा सुवस्था राखण्याच्या परिस्थिती निर्माण होणार नाही याची पण काळजी प्रत्येक जबाबदार नागरिकाने घेतली पाहिजे," असं अजित पवार म्हणाले. 

कुणाल कामराचे गाणं १०० टक्के खरं - आदित्य ठाकरे

"कुणाल कामराने केलेले गाणं १०० टक्के खरं आहे. भित्र्या टोळीने कॉमेडियन कुणाल कामराने ज्या शोच्या स्टेजवर कार्यक्रम सादर केला. एका गाण्यावर केवळ सुरक्षित वाटणारे भित्रे लोक अशाप्रकारे व्यक्त होऊ शकतात," अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

टॅग्स :कुणाल कामराएकनाथ शिंदेअजित पवार