कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:18 IST2025-12-26T15:17:46+5:302025-12-26T15:18:41+5:30
Konkan Railway News: मुंबईतून सुटणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या एका ट्रेनच्या कोचमध्ये कायमस्वरुपी वाढ करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Konkan Railway News: नाताळ, नववर्षाच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने मोठ्या प्रमाणावर वाढीव सेवांवर भर दिला आहे. विशेष करून कोकणात जाणाऱ्या ट्रेन वाढवण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन वाढवण्यात आल्यात आहेत. गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश या भागातूनही कोकणात जाण्यासाठी ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. यातच एक नियमित ट्रेनच्या कोचमध्ये वाढ करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी रेल्वेने यशवंतपूर – कारवार विशेष एक्स्प्रेसला तात्पुरत्या स्वरूपात जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. नववर्षानिमित्त गाडी क्रमांक ०६२६७ यशवंतपूर – कारवार विशेष एक्स्प्रेसला २७ डिसेंबर रोजी आणि गाडी क्रमांक ०६२६८ कारवार – यशवंतपूर विशेष एक्स्प्रेसला २८ डिसेंबर रोजी द्वितीय वातानुकूलित आणि सामान्य असा प्रत्येकी एक जादा डबा जोडला जाईल. द्वितीय वातानुकूलित दोन डबे आणि सामान्य चार डबे असतील. तर, इतर रेल्वे डब्यांची संख्या तशीच असेल. एकूण २३ डबे या रेल्वेगाडीला असतील, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.
मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
कोकण रेल्वेवर नियमित चालवल्या जाणाऱ्या दादर – तिरुनेलवेली एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डबा कायमस्वरुपी जोडण्यात आला आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. नववर्षानिमित्त प्रवाशांना ही भेट दिली आहे. दक्षिण रेल्वेतर्फे चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक २२६२९/२२६३० तिरुनेलवेली – दादर – तिरुनेलवेली एक्स्प्रेसला (साप्ताहिक) एक तृतीय वातानुकूलित डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी ही द्वितीय आणि तृतीय वातानुकूलित प्रत्येकी एक-एक डबा, तृतीय इकॉनॉमी एक डबा, शयनयान ६ डबे, सामान्य ४ डबे, जनरेटर कार एक डबा, एसएलआर एक डबा अशी १५ एलएचबी डब्यांची रेल्वेगाडी होती. यात आता एक तृतीय वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. त्यामुळे ही ट्रेन आता १६ एलएचबी डब्यांची झाली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.
दरम्यान, दादर – तिरुनेलवेली एक्स्प्रेस ट्रेन आठवड्यातून एकदाच धावते. या ट्रेनची पहिली फेरी मे २०१३ रोजी झाली होती. ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिविम, मडगाव या स्थानकांवर थांबते आणि पुढे जाते.