रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार -
श्रीगणेशाच्या ओढीने साऱ्या संकटांवर मात करत गणेशोत्सवाला कोकणात जाताना भोगाव्या लागणाऱ्या यातना पुढील वर्षीपासून तरी कमी होत सुखाचा प्रवास नशिबी येईल, या आशेवर कोकणवासी चाकरमानी असला तरी दरवर्षीचे हे दुष्टचक्र नेमके कधी थांबेल हे कुणीच सांगू शकत नाही.
राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक असलेल्या कोकणातील गणेशोत्सवाला जाण्याची तयारी काही महिने आधीपासूनच सुरू असते. कुठे रेल्वेचे बुकिंग कर, कुठे एसटीची तिकिटे काढ, ट्रॅव्हल्सवाल्याची माहिती घे नाही, तर खासगी गाड्यांनी जायचे नियोजन कर, हे सुरू होते. मिळेल त्या मार्गाने लाखो कोकणवासी कोकणात धडकतात आणि दहा दिवसांत परतीच्या प्रवासाला लागतात. कोकणात रेल्वे धावावी हे स्वप्न कोकणातल्या अनेक पिढ्यांनी पाहिले. कोकण रेल्वे योजना सुरू झाली तेव्हा हरखून गेलेल्या कोकणवासीयांनी स्वखुशीने आपल्या जमिनी कोकण रेल्वेला दिल्या आणि आपुलकीपोटी कोकण रेल्वेचे रोखेही विकत घेतले; पण सध्या कोकण रेल्वे नावालाच कोकणची उरली आहे आणि कोकणापेक्षा दक्षिणेकडेच्या राज्यांनाच तिचा अधिक लाभ मिळत आहे. अगदी गणेशोत्सवाच्या काळातही कोकण रेल्वेच्या सुखद प्रवासाला कोकणवासी पारखा झाला आहे. तशी वर्षभरच जनरलसह आरक्षित डब्यांमध्येही इतकी खच्चून गर्दी असते, की स्वच्छतागृहातही जाता येत नाही. महिला, वृद्ध आणि आजारी प्रवाशांची कुचंबणा होते. साफसफाईच्या नावाने तर बोंबच. मग गणेशोत्सवाच्या काळात काय परवड होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. जादा गाड्यांना तर मायबाप नसतो. सायडिंगला पडलेल्या या गाड्यांमध्ये बसून वेळ दवडायचा हाच उद्योग उरतो. सुरुवातीच्या स्थानकात रांगेत सोडले जाते, पण मधल्या स्थानकांचे काय? तिथे एकही पोलिस नसतो आणि त्याठिकाणी स्वयंसेवक नेमावेत, असे रेल्वेला वाटत नाही. प्रत्येक स्थानकात ट्रेनमध्ये शिरण्यासाठी जीवघेणी गर्दी प्रवास नकोसा करून टाकते.
कोकणवासीयांची मुख्यतः मदार असलेला मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्षांपासून शरपंजरी पडलेल्या भीष्मासारखा जर्जर अवस्थेत आहे. अनेक संघटना गेली चौदा वर्षे झगडत असताना कोकणाचे तारणहार म्हणवून घेणारे नेते त्याकडे डोळेझाक करीत आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आंदोलन छेडावे लागले होते. २००७ साली त्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी २०१३ साल उजाडावे लागले. तीन जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गाचे काम तेव्हापासून असे वर्षानुवर्षे सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात तर या महामार्गाची दैन्यावस्था आहे. काही दिवसांतच भाविक या मार्गावरून कोकणाकडे जायला सुरुवात होणार असताना टेमपाले उड्डाणपुलाचे काम कसेबसे उरकले गेले तरी त्यापुढचे लोणेरे, तळवली, कोलाड, नागोठणे, आमटेम, गडब या उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. लगतचे सर्व्हिस रोड अतिशय वाईट अवस्थेत आहेत. या सगळ्या खातेऱ्यात वाहतूककोंडी होत दहा-बारा तासांच्या प्रवासाला दोन-दोन दिवस लागतात. माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामाच्या निविदा काढून काम करण्यात येणार होते, त्याचे काय झाले याचा पत्ता अधिकारी लागू देत नाहीत, असा रहिवाशांचा आरोप आहे. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर नामधारी डागडुजी करून गणेशभक्तांची सोय करत असल्याचा आभास निर्माण केला जाईल; पण पावसाचा जोर वाढला तर ठिगळे मारलेले रस्ते पुन्हा उखडतील याची खात्री अधिकाऱ्यांसह सर्वांनाच आहे. गणेशोत्सवकाळात साडेचार हजारांहून अधिक एसटी गाड्या कोकणात सोडताना इतर भागांतून आलेल्या चालकांना रस्तेही प्रवाशांनाच दाखवावे लागतात. त्यांना घाटांची सवय नसते. या इतर भागांतील चालकांना वर्षातील काही दिवस कोकणातील फेऱ्या देऊन त्यांना तो भाग परिचित व्हावा याकडे प्रशासनाचे लक्ष नसते. गेल्या दोन वर्षांत झालेल्या निवडणुकांमुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील भाविकांसाठी मोफत एसटी गाड्या सोडण्याचे फॅड राजकीय पक्षांमध्ये पसरले आहे. आगामी महापालिका निवडणुकीमुळे याही वर्षी ते कायम आहे. या गाड्या रिकाम्या परततात आणि एसटीच्या तोट्यात भर घालतात. इतके सारे हाल सोसल्यानंतरही सोशीक कोकणवासी आपल्या नेत्यांचा जयघोष करत हसतमुखाने प्रवास करतो, हे दृश्य मात्र खूपच केविलवाणेच दिसते.