Disha Salian Death Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पाच वर्षांनी दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या तिच्या वडिलांनी केलीय. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिशाच्या पालकांना कोणीतरी सांगितल्याने त्यांना तीन वर्षांनी जाग आल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दिशा सालियनचे वडील सतिश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत सूरज पांचोली, आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत किशोरी पेडणेकर आणि पोलिसांनी आमच्यावर दबाव आणल्याचे म्हटलं आहे. दिशाच्या वडिलांच्या दाव्यावर किशोरी पेडणेकरांनी भाष्य केलं. मी दिशा सालियानच्या वडिलांना भेटले होते, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
"दिशा सालियनचे वडील अनेकदा महापौर ऑफिसला आले होते. त्यांनी अनेकदा विनंती केल्यानंतर मी त्यांना माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटले होते. आता सव्वातीन वर्षानंतर त्यांना कोण हे लक्षात आणून देतंय हा प्रश्न आहे. कोणीतरी मागे असल्याशिवाय त्यांना तीन वर्षांनी जाग आली का? तीन वर्षात आम्ही काही चुकीचं केलं असं त्यांना नाही वाटलं. माझा त्याच्याशी काही संबंधच नव्हता. या प्रकरणात आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी राणे पिता-पुत्र प्रयत्न करत आहेत हे अख्ख्या देशाला माहिती आहे," असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
"आमचा आजही मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. मुंबई पोलिसांवरही तुम्ही तीन वर्षांनी अविश्वास दाखवत आहात. या प्रकरणात बाकीच्या ज्या चौकश्या झाल्या त्याचा काय निकाल लागला हा प्रश्न आहे. मी दिलेले पुरावे मान्य करण्यास भाग पाडले असं म्हणत असतील तर त्यांनी ते दाखवून द्यावं. ते काही म्हणतील. त्यांनी तेव्हाच पोलिसांना, सीआडीला का नाही सांगितले," असाही सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.