BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 20:12 IST2025-12-29T20:10:06+5:302025-12-29T20:12:10+5:30
Kishori Pednekar: उद्धवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीबद्दलचा मोठा सस्पेन्स अखेर संपला आहे.

BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघा एक दिवस असताना, उद्धवसेनेतील उमेदवारीचा मोठा सस्पेन्स अखेर संपला आहे. उद्धवसेनेच्या पहिल्या ७५ उमेदवारांच्या यादीत नाव नसल्याने चर्चेत असलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पक्षाने अखेर उमेदवारी जाहीर केली. त्या वॉर्ड क्रमांक ११९ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
उद्धवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत किशोरी पेडणेकर यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर त्यांनी स्वतः 'मातोश्री' गाठून पक्षप्रमुखांची भेट घेतली. "पक्षातील अनेक नेत्यांना आज एबी फॉर्म देण्यात आले आहेत. मलाही आज संध्याकाळी ५ वाजता फॉर्म मिळाला आहे," अशी माहिती खुद्द किशोरी पेडणेकर यांनी दिली.
उमेदवारी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरीताईंनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. त्या म्हणाल्या की, "ही लढाई अत्यंत अटीतटीची आणि निकराची आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात काम करत आहोत आणि लोकांनी ते पाहिले आहे. त्यामुळे आम्ही जनतेच्या जीवावर ही निवडणूक लढवणार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबईची जनता नक्कीच आम्हाला मतदान करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे."
पक्षाच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने त्या नाराज होत्या का? या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. "मी पक्षाची उपनेती आणि प्रवक्ती आहे, त्यामुळे कामानिमित्त मातोश्रीवर माझे येणे-जाणे सुरूच असते. उमेदवारी मागणारे हजारो असतात, पण तिकीट एकालाच मिळते. त्यामुळे थोडी नाराजी असणे स्वाभाविक आहे, पण आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही नाराजी व्यक्त करतो आणि पुन्हा कामाला लागतो", असेही त्या म्हणाल्या.