Join us

Kirit Somaiyya : 'किरीट सोमैय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 10:34 IST

Kirit Somaiyya : अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार असल्याचं किरीट सोमैय्यांनी म्हटलं होतं.

मुंबई - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले. त्यानंतर, किरीट सोमैय्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केला. तसेच, माझ्यावर स्थानबद्धतेची कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोपही सोमैय्यांनी केला. आता, सोमैय्यांच्या आरोपाला शिवसेनेनं उत्तर दिलंय. 

अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार असल्याचं किरीट सोमैय्यांनी म्हटलं होतं. त्यासंदर्भात, संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, किरीट सोमैय्यांनी चंद्रावर जाऊन, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही आहे, देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे, आरोप कोणीही करू शकतं, आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला टाळं लावता येत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर सरकारला कारवाई करावी लागते. त्यानुसारच, गृहमंत्रालयाने किरीट सोमैय्यांवर कारवाई केल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार एखाद्याला आरोप करायचेच असेल तर आम्ही काय करणार, आरोप कोणावर होत नाहीत, आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होतात, अमित शहांवर होतात. भाजपाशासित मुख्यमंत्र्यांवरही होतात. सध्या आरोप करणं ही फॅशन झालीय, असे म्हणत किरीट सोमैय्यांच्या आरोपाल गंभीरतेनं घेण्याची गरज नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  

मुश्रिफांच्या स्वागातला गुंड येणार होते का?

घोटाळेबाजाऐवजी, घोटाळा उघड करणाऱ्यांनाच ठाकरे सरकारने अटक केली. मला कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली. कागल येथे हसन मुश्रिफ यांचा दौरा आहे, त्याचवेळेस सोमैय्या कोल्हापूरात येत आहेत. त्यामुळे, गनिमी काव्याने किरीट सोमैय्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे, असे मला पत्रातून कळविण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की राष्ट्रवादीचे गुंड. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का? असा प्रश्न किरीट सोमैय्या यांनी विचारला आहे.

घोटाळे जनतेसमोर मांडण्याच्या मला वरिष्ठांच्या सूचना

हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील ईडीच्या तक्रारीमुळेच माझ्यावर पोलिस कारवाई करण्यात आली. माझ्या जीवाला धोका असल्याचं, माझ्यावर गनिमी काव्याने हल्ला होणार असल्याचं पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मग, पोलिसांना ही माहिती कोणी दिली? असा सवालही किरीट सोमैय्यांनी विचारला आहे. दरम्यान, मुश्रिफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना मला देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचेही ते म्हणाले.   

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारकिरीट सोमय्या