Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiyya: Video: अखेर सोमय्या समोर आले, गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत संजय राऊतांना सांगितला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 13:53 IST

किरीट सोमय्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत राऊत यांना लक्ष्य केले आहे.

मुंबई - INS विक्रांत निधी संकलन प्रकरणात सत्र न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. सोमय्या पिता पुत्रांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. सोमय्यां हे गोवा किंवा गुजरातला लपले असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता, राऊत यांच्या आरोपवर स्वत: किरीटो सोमय्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत उत्तर दिलंय.

किरीट सोमय्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत राऊत यांना लक्ष्य केले आहे. तसेच, तुम्हीही किती खोटे आरोप केले, तरी आम्ही ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणारच, असा इशाराही त्यांनी दिलाय.  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने विक्रांत युद्धनौकेला 60 कोटी रुपयांत भंगारमध्ये विकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा आम्ही निषेध केला होता, भाजपने 10 डिसेंबर रोजी एक तासाभराचा, सांकेतिक प्रतिकात्मक निधी संकलनाचा कार्यक्रम केला. त्यामध्ये, 11 हजार रुपये जमले होते. गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात भाजप-शिवसेना खासदारांनी 17 डिसेंबरला स्वत: राष्ट्रपतींना भेटून ही माहिती दिली. तसेच, राज्यपालांना माहिती दिली होती, आज 10 वर्षानंतर संजय राऊत सांगतात की, किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये ढापले. पण, एक कागद नाही, एक पुरावा नाही, असे म्हणत सोमय्यांनी राऊतांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले. तसेच, याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात जात आहोत, तिथं ही सगळी माहिती ठेवणार असल्याचेही सोमय्यांनी व्हिडिओतून म्हटलंय.

सोमय्या गुजरात किंवा गोव्यात- संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांबाबत महत्वाचा दावा केला आहे. गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या लपून बसल्याचा दावा राऊतांनी केलाय. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, असंही राऊत म्हणाले.

'दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि...'

किरीट सोमय्या यांच्याबाबत माध्यमांशी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, ''किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने 'झेड' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे, त्यांच्या ठावठिकाणाबाबत आम्ही केंद्राकडे विचारणार करणार,'' अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच, "दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि स्वत:वर आरोप झाले की, चौकशीला सामोरे जायचे नाही. हे काही शूरपणाचे लक्षण नाही,'' असा टोलाही वळसे पाटलांनी लगावला.

टॅग्स :संजय राऊतमनसेशिवसेनाकिरीट सोमय्यागोपीनाथ मुंडे