Join us  

प्रीति झिंटा कायद्याच्या कचाट्यात ! डॉक्टरांच्या आरोपामुळे चालणार 38 लाखांचा खटला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:37 PM

बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा पुन्हा एकदा वादात अडकली आहे. 38 लाख रुपयांचा भुर्दंड भोगावा लागण्याची शक्यता

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा पुन्हा एकदा वादात अडकली आहे. प्रीतिची कंपनी केपीएच ड्रीम्स क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. चंदिगडमधील डॉक्टर सुभाष सतीजा यांनी प्रीतिच्या कंपनीविरोधात याचिका दाखल केली आहे. ''मी आपले घर वास्तव्यासाठी भाडेतत्वावर दिले होते, मात्र या जागेवर कार्यालय थाटण्यात आले'', असा आरोप सतीजा यांनी केला आहे. याबाबतची माहिती मालमत्ता विभाग कार्यालयाला मिळताच मालमत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी सतीजा यांना 38 लाख रुपयांची नोटीस बजावली आली. ही रक्कम आता सतीजा यांनी प्रीतिच्या कंपनीकडूनच वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यासाठी डॉक्टर सतीजा यांनी जिल्हा न्यायालयात कंपनीविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका रद्द करण्यात यावी यासाठी कंपनीनं कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टानं तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता प्रीतिच्या कंपनीविरोधात कोर्टात खटला चालणार असून सुनावणीसाठी 23 जुलैची तारिख देण्यात आली आहे. दरम्यान, दुसरीकडे केपीएच ड्रीम्स क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं आरोप फेटाळून लावत निवासस्थानाचा वापर केवळ अधिकाऱ्यांना येथे थांबवण्यासाठी केला जात होता, असे स्पष्टीकरण दिले आहे. 

'आयपीएल सामने सुरू असताना केवळ अधिकाऱ्यांना येथे थांबवले जायचे. सतीजा यांना आपल्या घराची विक्री करायची होती, मात्र जेव्हा मालमत्ता विभागानं 38 लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यावेळेस सतीजा यांनी यास आमच्या कंपनीला जबाबदार ठरवले. या आधारे कंपनीनं कोर्टात अर्जदेखील दाखल केला होता. मात्र कोर्टानं तो फेटाळून लावला.', असंही कंपनीनं सांगितलं. 

टॅग्स :प्रीती झिंटाबॉलिवूडआयपीएल 2018क्रिकेटकरमणूकन्यायालयकिंग्ज इलेव्हन पंजाब