कांदिवलीला पश्चिम उपनगरातील सांस्कृतिक नगरी बनविणार - आ. अतुल भातखळकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:17 IST2024-11-29T09:17:14+5:302024-11-29T09:17:41+5:30
धारावीनंतर मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टीमधील नागरिकांचे त्याच भागात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही कांदिवलीचे भाजप आ. अतुल भातखळकर यांनी दिली

कांदिवलीला पश्चिम उपनगरातील सांस्कृतिक नगरी बनविणार - आ. अतुल भातखळकर
मुंबई - विलेपार्लेपासून थेट कांदिवलीपर्यंत पूर्वेला कोणतेही मोठे आणि सुसज्ज नाट्यगृह नाही. त्यामुळे मतदारसंघातील मालाड पूर्वमधील गोशाळा मैदानाच्या जागेवर ७ हजार स्क्वेअर फुटांचे मोठे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. नाट्य कलाकारांसाठी येथे कलादालन तसेच पश्चिम उपनगरातील सर्वात मोठे सांस्कृतिक केंद्र असेल. त्याचबरोबर धारावीनंतर मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टीमधील नागरिकांचे त्याच भागात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही कांदिवलीचे भाजप आ. अतुल भातखळकर यांनी दिली. आ. भातखळकर यांनी गुरुवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
कांदिवलीमध्ये वाहतूक, वीज आणि पाणी या समस्या आहेत. हनुमान नगर झोपडपट्टीत गटारातून पाण्याच्या पाईपलाईन जातात. एसआरएच्या माध्यमातून झोपड्यांचा पुनर्विकास करणे हाच त्यावर उपाय आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देऊन नागरी सुविधा उपलब्ध करून देणे. त्यासाठी रहिवाशांना विश्वासात घेऊन त्यांचे पुनर्वसन तिथेच करावे, अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
आता कोणत्या कामांना प्राधान्य असेल?
वाढणारी वाहन संख्या, अरुंद रस्ते यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या आहे. यासोबतच पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी अंडरग्राउंड पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. सर्व डीपी रोड तातडीने खुले करून त्यावरील अतिक्रमणे हटवून आवश्यक तिथे पुनर्वसन करणे, त्यांची वाहतूक प्रकल्पांशी कनेक्टिव्हिटी वाढवणे गरजेचे आहे.
स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीवर काय मार्ग काढणार आहात?
मतदारसंघात मालाड आणि कांदिवली ही दोन्ही रेल्वे स्टेशन येतात. या परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन होण्यासाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यासाठी एक विशेष प्राधिकरण स्थापन करण्याची आवश्यकता आहे. यामुळे स्टेशन परिसरात फेरीवाले, वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही.
कोणते विषय प्रथम हाती घेणार आहात?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व डीपी रोड तातडीने खुले करणे आवश्यक आहे. त्यावरील अतिक्रमणे हटवून, त्यांचे आवश्यक पुनर्वसन करून त्यांची कनेक्टिव्हिटी रेल्वे स्टेशन परिसरात उपलब्ध करून त्याचे नियोजन आवश्यक आहे. या शिवाय अंडरग्राउंड पार्किंग वाढवण्याची आवश्यकता आहे. मागाठाणे ते गोरेगाव हा १२० मीटरचा रस्ता दीड वर्षात पूर्ण करण्यावर भर असेल.
सुसज्ज रुग्णालय उभारणार
मुंबईमध्ये जे. जे., के. ई. एम., कस्तुरबा, सायन यासारख्या मोठ्या रुग्णालयांच्या तुलनेत उपनगरामध्ये मोठी रुग्णालये कमी आहेत. त्यामुळे मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ हजार बेड्सचे ‘स्टेट ऑफ द आर्ट’ असे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. बोरीवली, मालाड, कांदिवली, गोरेगावमधील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होईल.