मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा राजमार्ग ठरेल 'कलासेतू' - सुधीर मुनगंटीवार

By संजय घावरे | Published: March 1, 2024 05:02 PM2024-03-01T17:02:15+5:302024-03-01T17:02:45+5:30

मराठी चित्रपटसृष्टीच्या उत्कर्षासाठी शासनाचा संवादरूपी उपक्रम

'Kalasetu' will be the highway to take Marathi cinema to a different height, said that Minister Sudhir Mungantiwar | मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा राजमार्ग ठरेल 'कलासेतू' - सुधीर मुनगंटीवार

मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा राजमार्ग ठरेल 'कलासेतू' - सुधीर मुनगंटीवार

मुंबई - कलाकारांच्या सूचनांचा विचार करून शासन आवश्यक त्या सर्व गोष्टींचा निश्चितच पाठपुरावा करेल. शासनातर्फे अनेक नव्या योजना, प्रस्ताव लागू करण्यात येणार आहेत. 'कलासेतू'द्वारे संवादाचा निर्माण झालेला हा सेतू मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा राजमार्ग ठरेल, असा विश्वास सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 'कलासेतू' या उपक्रमात ते बोलत होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि  शासन यांच्यात समन्वय साधत त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सूचना जाणण्याच्या दृष्टिकोनातून 'कलासेतू' या विशेष उपक्रम राबवण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने 'कलासेतू' या उपक्रमांतर्गत तीन वेगवेगळे परिसंवाद आयोजित करण्यात आले. यात मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाकारांनी आपले म्हणणे मांडले.

यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व  सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते. पहिल्या परिसंवादाला ज्येष्ठ तंत्रज्ञ उज्वल निरगुडकर, वितरक समीर  दिक्षित, लेखक-दिग्दर्शक अभिजीत पानसे, कामगार नेते विजय हरगुडे आदिंनी सहभाग घेतला. यांच्याशी मिडिया वनचे गणेश गारगोटे यांनी संवाद साधला. याद्वारे मराठी सिनेसृष्टीच्या विकासासाठी काय करता येईल याचा परामर्श घेण्यात आला.

'मराठी चित्रपटसृष्टीसमोरील नवी आव्हाने' या पहिल्या परिसंवादात १५००हून अधिक चित्रपट  तयार होतात. त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे तसेच अमेरिका फिल्म मार्केटची माहिती  निर्मात्यांना देणे, सबटायटल्सबाबत कार्यशाळा आयोजित करणे आदि वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले. 'शासकीय धोरण आणि वेबपोर्टल' या दुसऱ्या परिसंवादात ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेमॅटोग्राफर  संजय जाधव, आशुतोष पाटील योगेश कुलकर्णी सहभागी झाले. मराठीला चित्रनगरीत ५०% सवलत देणे एसजीएसटी बंद करणे, करपरती योजना चालू करणे, अनुदान बंद करणे, निर्माता होण्याकरिता नियमावली तयार  करणे, आंतरराष्टीय चित्रपटासाठी पॅनल निर्माण करणे, निर्मात्यांसाठी व्यासपीठ निर्माण करणे, सिंगल स्क्रीनचे कर माफ करणे आदि मुद्द्यांचा विचार करण्यात आला. 

तिसऱ्या परिसंवाद चित्रपट निर्माते, वितरण, विपणन याबाबत चर्चा करण्यात आली. यात मकरंद अनासपुरे, दीपक  देऊळकर, किशोरी शहाणे, चैतन्य चिंचलीकर, विकास खारगे यांनी सहभाग घेतला. नवीन निर्मात्यांना मार्गदर्शन करणे, मल्टिप्लेक्स दर कमी करणे, मराठीसाठी २०० हून अधिक चित्रपटगृह बांधणे, एसटी स्टँडजवळ मल्टीप्लेक्स उभारणे, वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे आदी अनेक उपायांचा अंतर्भाव यात करण्यात आला. 

भविष्यातील बदलाची पावले ओळखून आणि येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाचा विचार करून मराठी चित्रपटसृष्टीने  सर्वांगाने वेगळा विचार करण्याचा सूर कलासेतूच्या परिसंवादात उमटला. आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी  चित्रपटांचा सहभाग, मराठी चित्रपट महामंडळाचे योगदान, चित्रपटसृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा देणे, इतर भाषिक लोकांचे रजिस्ट्रेशन, ओटीटी प्लॅटफॉर्म तयार करणे,  फिल्मसिटीमध्ये  AUGMC त्यात करणे,  चित्रपटगृह, नाट्यगृह उभारणे आदी  सुविधा प्रामुख्याने होणे गरजेचं असल्याचं  मत सर्वांनीच मांडलं. यावेळी मराठी  चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार,  निर्माते,  दिग्दर्शक , कलाकार तंत्रज्ञ  आणि वाहिन्याचे प्रमुख उपस्थित होते.

Web Title: 'Kalasetu' will be the highway to take Marathi cinema to a different height, said that Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.