'कहो ना प्यार है'... गाण्याला अजरामर करणारे गीतकार अब्राहम अश्क कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 23:06 IST2022-01-16T23:03:29+5:302022-01-16T23:06:29+5:30
ऋतिक रोशनचा पहिलाच चित्रपटी सुपरहीट ठरला होता, त्याचं एक कारण म्हणजे त्यातील गाणे. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला कहो ना प्यार है.. गाण्यांमुळे गाजला.

'कहो ना प्यार है'... गाण्याला अजरामर करणारे गीतकार अब्राहम अश्क कालवश
मुंबई - ऋतिक रोशनने ज्या चित्रपटातून डेब्यू केला त्या 'कहो ना प्यार है' (Kaho Na Pyaar Hai) या शीर्षक गीतचे गीतकार अब्राहम अश्क (Ibrahim Ashq) यांचे रविवारी कोरोनामुळे (Corona Viras) मुंबईत निधन झाले. अब्राहम अश्क यांची धाकटी मुलगी मुसफा खान हिने अब्राहम अश्क यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. रविवारी सायंकाळी 4.00 वाजता मीरा रोड येथील मेडीटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अब्राहम अश्क यांनी अखेरचा श्वास घेतला.
ऋतिक रोशनचा पहिलाच चित्रपटी सुपरहीट ठरला होता, त्याचं एक कारण म्हणजे त्यातील गाणे. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला कहो ना प्यार है.. गाण्यांमुळे गाजला. त्यातील, शिर्षक गीतही प्रचंड गाजले होते, आजही युट्यूबवर ते गीत पाहिले जाते, ऐकले जाते. या गीताचे गीतकार अब्राहम अश्क यांनी आज जगाचा निरोप घेतला. मात्र, आपल्या गाण्यांमधून, रचनांतून ते आठवणीत राहतील.
अब्राहम यांची मुलगी मुसफा हिने अधिक माहिती देताना सांगितले की, शनिवारी सकाळी बाबांना खूप खोकला होता. तसेच रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. त्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर आज रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी 9 वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांच्या मुलीने दिली.
अब्राहक यांनी 'कोई मिल गया', 'क्रिश', 'वेलकम' 'ऐतबार', 'जानशीन', 'ब्लॅक अँड व्हाईट', 'आप मुझे अच्छे लगने लगे' 'बॉम्बे टू बैंकॉक' अशा अनेक सिनेमांची गाणी लिहिली आहेत. अब्राहम अश्क हे उत्तम कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जात होते. पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'दैनिक इंदौर समाचार' या वृत्तपत्रात काम करण्यासोबतच त्यांनी अनेक मासिकांसाठीही काम केले आहे.