Devendra Fadnavis on Manoj Jarange: "सरकारने समिती स्थापन केली आहे. मंत्रिमंडळाची उपसमितीही आहे. उपसमितीला यापूर्वीच ज्या काही मागण्या आल्या होत्या. त्यावर ते विचार करत आहेत. नुसती आश्वासने देऊन चालणार नाही. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील", अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. मनोज जरांगे यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांनीही सगळ्यांना आवाहन केले आहे की, नियमाने उपोषण करायचं आहे. सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शासनाचीही सहकार्य करण्याचीच भूमिका आहे."
"आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की, लोकशाही पद्धतीने एखादे आंदोलन चालत असेल, तर त्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे मनाई करण्याचे कारण नाही. लोकशाहीत चर्चेतून प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन त्याचा एक मार्ग असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला सरकारच्या वतीने जे सहकार्य लागेल, ते आम्ही करतो आहोत. उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत, त्यानुसारच सगळं सहकार्य करत आहोत", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीने वागतात अन् गालबोट लागत
"हे खरंय आहे की काही ठिकाणी रास्ता रोको केला. वाहतुकीत अडथळा आला. पण, पोलिसांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी सहकार्य केलं आणि जागा मोकळ्या केल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यावर वाहतुकीत अडथळा येतो, ते आपल्याला पाहायला मिळालं आहे. काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीने वागतात आणि त्यामुळे संपूर्ण आंदोलनालाच गालबोट लागतं. तर अशा पद्धतीने कुणी वागू नये, याकडे लक्ष द्यावं लागेल. मनोज जरांगे यांनीही तशाच प्रकारचं आवाहन केलं आहे",
"मनोज जरांगे यांनी परवानगी मागितली आहे. कायद्याच्या चौकशीत राहून आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासन त्याचा विचार करेल. आंदोलनातील त्यांच्या मागण्याबद्दल जो मार्ग काढता येईल, तो काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. तसे मार्ग कसे काढता येतील, असाच प्रयत्न आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.