२६ जुलै : मुंबईत जोरदार सरी कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 17:43 IST2020-07-25T17:39:23+5:302020-07-25T17:43:16+5:30
कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

२६ जुलै : मुंबईत जोरदार सरी कोसळणार
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या पावसाने आता ब-यापैकी विश्रांती घेतली असली तरी २६ जुलै रोजी म्हणजे रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. आणि मध्यम स्वरुपाच्या पावसासह अधून मधून जोरदार सरी पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात ब-याच ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईचा विचार करता शनिवारी मुंबईत २३.८ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात १ ठिकाणी भिंतीचा भाग पडला. ४ ठिकाणी झाडे कोसळली. १ ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. पडझड सुरु असतानाच मुंबईत मात्र पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. दिवसभर हवामान ढगाळ असले तरी पाऊस मात्र बेपत्ता होता. दुपारी काही अंशी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी ऊनं पडल्याचे चित्र होते. श्रावणातदेखील श्रावणसरी नसल्याने आता तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात येत असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ जुलैपासून पावसाचा जोर वाढला तरी तापमान कमी होईल. आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल. दरम्यान, स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईतला पाऊस वाढेल.