लाखो गणेशभक्तांचा प्रवास राज्य सरकारच्या पुढील निर्णयावर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 03:31 PM2020-07-12T15:31:50+5:302020-07-12T15:32:37+5:30

सध्या कोकणात जाण्यासाठी रेल्वे, एसटीची सेवा नाहीच 

The journey of millions of Ganesha devotees on the decision of the government | लाखो गणेशभक्तांचा प्रवास राज्य सरकारच्या पुढील निर्णयावर अवलंबून

लाखो गणेशभक्तांचा प्रवास राज्य सरकारच्या पुढील निर्णयावर अवलंबून

Next

 

कुलदीप घायवट

मुंबई : दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी गणेशभक्त रेल्वेचे तिकीट महिना-दोन महिने आधीच आरक्षित करून ठेवतात. यासह एसटीचे वैयक्तिक तिकीट आरक्षण, प्रासंगिक करारावर एसटी बस आरक्षित केल्या जातात. मात्र यंदा कोरोनाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेची किंवा एसटीची कोणतीही विशेष सोय अद्याप करण्यात आलेली नाही. रेल्वेच्या २०० विशेष ट्रेनच्या फेऱ्या धावत आहेत. मात्र राज्य सरकारच्या सूचनेनुसार या फेऱ्यामधून राज्यांतर्गत रेल्वे प्रवास करता येणार नाही. तसेच एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून गणपतीसाठी कोकणात विशेष फेऱ्या सोडण्याच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे लाखो गणेशभक्तांचा प्रवास राज्य सरकारच्या पुढील निर्णयावर अवलंबून आहे.

कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी लाखो गणेशभक्त रेल्वे, एसटी आणि इतर पर्यायी मार्गाने प्रवास करतात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे प्रवास करणे शक्य होणार नाही. रेल्वेच्या २०० विशेष ट्रेन धावत आहेत. यापैकी नेत्रावती एक्सप्रेस मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावत आहे. मात्र राज्य सरकारच्या सुचनेप्रमाणे एक्सप्रेसमधून राज्यांतर्गत प्रवास करण्यास मनाई आहे. परिणामी, राज्यामध्ये प्रवास करण्यासाठी रेल्वे तिकीट ऑनलाईन तिकीट संकेतस्थळावर किंवा तिकीट खिडकीवर आरक्षण करता येत नाही. दरवर्षी रेल्वेचे तिकीट आरक्षित झाले नाही. तर गणेशभक्तांना एसटी बस पर्याय असतो. मात्र यंदा हा पर्याय देखील धूसर आहे. एसटीची प्रासंगिक करारवर कोकणात जाण्यासाठी सोय होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हि सुविधा देखील रद्द करण्यात आली आहे. एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून एसटीला विशेष गाड्या सोडण्याच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे कोकणात प्रवास कसा करायचा, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक ०६३४५ एलटीटी ते तिरुअनंतपुरम अशी कोकणातून गाडी धावत आहे. या गाडीला राज्यात ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ येथे थांबा आहे. मात्र राज्य सरकारच्या सुचनेनुसार राज्यांतर्गत प्रवास करण्यास  मनाई असल्याने या प्रवासाचे तिकीट मिळत नाही. दरम्यान, गोव्यातील थिवीम येथे थांबा असून एलटीटी ते थिवीम आणि त्यापुढील स्थानकात प्रवास रेल्वेने करता येत आहे. मागील वर्षी रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी १८६ वेगवेगळ्या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. यासह एसटीच्या अनेक मार्गावर प्रवाशांच्या संख्येनुसार जादा बस सोडल्या होत्या. मात्र यंदाचा कोकणातील  प्रवास  राज्य सरकारच्या पुढील निर्णयाप्रमाणे  होणार आहे.

 

राज्यसरकार ज्याप्रमाणे एसटीला सूचना देतील. त्यानुसार एसटी महामंडळ सूचनाचे पालन करेल. गणपती विशेष गाड्यासाठी कोणत्याही सूचना आल्या नाहीत. जिल्हाबंदी असल्याने प्रासंगिक करारावर गाड्याची सुविधा नाही.
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, वाहतूक खाते, एसटी महामंडळ

 

 

 

राज्य सरकारने ज्याप्रमाणे निर्देश दिलेले आहेत. त्याचे पालन केले जात आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The journey of millions of Ganesha devotees on the decision of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app